मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळींच्या (BDD Chawl) पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांच्या (Mumbai Police) घराचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र याबाबत राज्य सरकारने आता निर्णय घेतला असून, पोलिसांना हे घर 50 लाख रुपये बांधकाम खर्चात मिळेल अशी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घोषणा केली आहे. मात्र हा निर्णय संतप्त करणारा आहे अशी पोलीस आणि कुटुंबियांची भावना आहे. कारण तुटपुंज्या मिळकतीत घर चालवणे आणि 50 लाखांचं घर घेणं कोणालाच शक्य नसल्याची परिस्थिती आहे.
बीडीडी पोलिस वसाहतीत राहणाऱ्या उत्कर्षा उत्कर्ष सावंत. पती 8 महिन्यापूर्वी आजारी असल्यामुळे मृत्यू पावले. बीडीडी पोलीस चाळ क्रमांक 26 मधील रहिवासी. घरी 2 मुली, सासू आणि त्या स्वतः. पती उत्कर्ष उदय सावंत हे पोलीस खात्यात शिपाई होते. 29 वर्ष त्यांनी सेवा केली. सावंत कुटुंबीयांच्या तीन पिढ्या या वरळीतील या बीडीडी चाळीत वास्तव्यास आहेत. उत्कर्ष सावंत यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घरातील कर्ताधर्ता पुरुष गेल्याने जगायचं कसं खायचं कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. जेमतेम काही काम करून उत्कर्षा सावंत या आपल्या कुटुंबाचा उपचार करत उदरनिर्वाह करत आहेत. त्यामुळे आम्ही जगायचं कसं खायचं कसं याच प्रश्न आम्हाला आहे. त्यात सरकारने सांगितलेले इतक्या रकमेचे घर आम्ही नाही घेऊ शकत, असे उत्कर्षा सावंत सांगतात. गेल्या अनेक वर्षापासून आपल्या घराचा प्रश्न सावंत कुटुंबीयांचे समोर कायम उभा आहे. घरच्या कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर अद्याप पेन्शन ही सुरू झालेली नाही, असं सावंत आजी सांगतात.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प गेल्या तीन वर्षां विविध कारणांमुळे रखडत होता. या प्रकल्पात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांबाबत प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे बांधकामाच्या अनेक बाबी रखडल्या होत्या. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्र्यांनी बैठक घेत या बीडीडी येथील पोलीस कुटुंबियांना पन्नास लाख रुपयात घर देण्यावर निर्णय घेतला. मात्र 50 लाख रुपये हे या पोलीस आणि कुटुंबियांना परवडणारे नाही, अशी प्रतिक्रिया बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलीस आणि कुटुंबियांनी दिली आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा नीट विचार करून आम्हाला परवडेल असं घर आम्हाला उपलब्ध करून द्यावं अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ,स्थानिक आमदार आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.
बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात पोलीस कुटुंबीय हे 16 चाळीत राहतात. सुमारे 2 हजार 250 पोलीस कुटुंबीय राहत आहेत. या सर्व पोलिस आणि कुटुंबीयांची परिस्थिती सावंत कुटुंबीयांसारखीच आहे. त्यामुळे सरकारने पोलिसांना 50 लाख रुपये बांधकाम खर्चात घर देण्याचा निर्णय घेतलाय. तो निर्णय बीडीडीत राहणाऱ्या पोलीस कुटुंबीयांना संतप्त करणार आहे .पोलीस कुटुंबीयांनी सरकारने आम्हाला परवडणारी घरे द्यावीत अशी विनंती केली आहे . सरकारने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही त्यांनी असं म्हटलंय.त्यामुळे बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात पोलिसांना घरे ही परवडणाऱ्या किमतीत खरंच हे सरकार देईल का? की गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या घराचा असणारा प्रश्न कायम ठेवेल हे पुढील काळात पाहणे महत्त्वाचे ठरेल.