मुंबई : मुंबई पोलिसांनी एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. मुंबईतील अंबोली पोलिसांनी पालघरमध्ये एका फॅक्टरीवर छापा टाकला. या फॅक्टरीमध्ये जवळपास 18 लाखांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं, तर 4 जणांना अटकही करण्यात आली आहे.


पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये एका फॅक्टरीवर छापा टाकला. यात पोलिसांना 18 लाखांचं ड्रग्ज, 65 हजारांची रोकड, आणि 41 लाखांचं ड्रग्ज बनवण्याचं साहित्य सापडलं. याप्रकरणी पोलिसांनी सान्याल बने, अन्वर चौधरी, सुलतान अहमद रौफ यांना अटक केली आहे.

पोलिसांनी शुक्रवारी रात्री नदीम शेख नावाच्या व्यक्तीला 1 किलो एमडी ड्रग्जसोबत पकडलं होतं. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेऊन जास्त चौकशी केल्यावर 4 महिन्यांपूर्वीच ही फॅक्टरी सुरु झाल्याचं उघड झालं. या फॅक्टरीची माहिती इतरांना कळू नये म्हणून लॅबमधला पाईप 50 मीटर खोल जमिनीत सोडण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात आणखी कितीजण गुंतले आहेत याचा तपास सुरु केला आहे.