मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध झुगारणाऱ्यांकडून मुंबई पोलिसही दंडवसुली करीत आहेत. पोलिसांनी चार कोटी रुपये जमा केले आहेत. नियमभंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यापेक्षा दंडात्मक कारवाईवर पोलिसांनी भर दिला आहे. 


विशेष  म्हणजे पोलिसांनी वसूल केलेल्या दंडाची निम्मी रक्कम महानगरपालिकेच्या तिजोरीत जाणार असून उर्वरित रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा केली जात आहे. याच पोलीस कल्याण निधीचा वापर हा पोलीस आणि त्यांच्या कटुंबियांना आर्थिक मदत, पाल्यांचे शिक्षण, रोजगार तसेच इतर कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी केला जातो. 


मुंबईसह देशभरामध्ये मार्च 2020 कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला. अचानक करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांची घरातच कोंडी झाली. सुरुवातीला पोलिसांना विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी जनजागृती केली. कारवाईचा धाक दाखविण्यासाठी ठिकठिकाणी संचलन केले. उठाबशा, बेडूक उड्या असेही प्रयोग करून पाहिले. परंतु नंतर नियम मोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, अत्यावश्यक वस्तू कायदा, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा, सरकारी आदेशाचे उल्लंघन, जमावबंदी आदेश धुडकावणे, अफवा पसरविणे अशा विविध कायद्यांतर्गत असलेल्या कलमांद्वारे मुंबईत वर्षभरात 57 हजार 969 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र हे सर्व गुन्हे मागे घेणार असल्याचे सरकारच्या वतीने जाहीर करताच कारवाई थंडावली. 


कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागताच पालिकेच्या वतीने क्लीनअप मार्शलच्या मार्फत दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. क्लीनअप मार्शलची अपुरी संख्या आणि त्यांना नागरिक जुमानत नसल्याने 20 फेब्रुवारीला पोलिसांना दंडवसुलीचे अधिकार देण्यात आले. मुंबई पोलिसांनी कारवाईचा धडाका लावत जवळपास महिन्यभराच्या कालावधीत 2 लाख 3 हजार जणांकडून 4 कोटींची वसुली केली. या रकमेतील 50 टक्के रक्कम पोलीस कल्याण निधीसाठी तर उर्वरीत रक्कम पालिकेकडे जमा केली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांनी सांगितले. 


कल्याण निधीतून उपक्रम :  



  • नायगावसह ताडदेव, वरळी आणि मरोळ येथे सबसिडीअरी कॅन्टीन असून यातून अत्यावश्यक वस्तूंचा माफक दरात पुरवठा केला जातो. 

  • पोलीस मुख्यालयासह 13 ठिकाणी माफक दरात कॅन्टीनची व्यवस्था 

  • सभासदांना अत्यंत तातडीच्या प्रसंगी तसेच आजारांकरिता वैद्यकीय मदत 

  • कुणाचा मृत्यू झाल्यास तातडीची आर्थिक मदत 

  • वरळी मुख्यालय येथे 89 कॉट, मरोळ येथे 32 कॉट आणि चेंबूर पोलीस ठाण्यातील शांती हॉल येथे 27 कॉट असलेले वसतिगृह महिला पोलिसांसाठी उपलब्ध 

  • पोलिसांच्या लहान मुलांसाठी 10 ठिकाणी बालवाडी. 

  • मुंबईतील पोलीस ठाणी तसेच इतर कार्यालयाच्या ठिकाणी 34 व्यायामशाळा. 

  • पोलिसांच्या पाल्यांचा गौरव आणि शैक्षणिक साहित्य वाटप 

  • पोलिसांच्या शिक्षण पूर्ण झालेल्या पाल्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावे. 

  • पोलीस कुटुंबियांसाठी उमंग तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन


महत्त्वाच्या इतर बातम्या :