कल्याण- डोंबिवली : रात्री अपरात्री कचरा फेकणाऱ्या नागरिकांमुळे शहरात अस्वच्छता पसरत होती. वारंवार सांगून दंड आकारणी करून देखील काही ठिकाणी कचरा टाकणे सुरूच असल्याने अखेर केडीएमसीने ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. कचरा टाकण्यात येणारी ठिकाणे ओळखून या ठिकाणी रात्रीच्या सुमारास ड्रोन कॅमेराच्या साहाय्याने पाळत ठेवली जाणार आहे. काल रात्रीपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवली शहर स्वच्छतेसाठी केडीएमसीने विविध उपायोजना राबवल्या आहेत. ओला सुका कचरा वर्गीकरण, कचरा कुंडीमुक्त शहर, रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या विरोधात कठोर कारवाई ,विविध ठिकाणी मार्शलची नियुक्ती अशा विविध उपाययोजना राबवल्या आहेत .मात्र आज काही बेजबाबदार नागरिकाकडून रात्री अपरात्री उघडयावर कचरा टाकत अस्वच्छतेत भर टाकली जाते .अनेकदा ताकीद देऊन ही रात्रीच्या सुमारास नजर चुकवून कचरा रस्त्यावर टाकला जातो. अशा नागरिकांवर नियंत्रण आणण्यासाठी केडीएमसीकडून आता ड्रोन कॅमरेचा वापर केला जाणार आहे.
या साठी कचरा टाकण्यात येणारी ठिकाणी ओळखून त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस ड्रोन च्या आधारे कचरा फेकणार्यावर नजर ठेवण्यात येणार आहे. ड्रोन कॅमेरात आलेल्या इमेजच्या आधारे संबंधीत व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे .