मुंबई : कोरोनाबाधितांमध्ये नव्यानं होणारी वाढ ही आता चिंता वाढवत असल्याचं स्पष्ट होऊ लागलं आहे. बुधवारी सायंकाळी प्रशासनानं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार एकट्या मुंबईत 24 तासांमध्ये तब्बल 5185 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, सहाजणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. 


एका दिवसात 5 हजारहून अधिक रुग्णांची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळं आता नेमका कोरोना नियंत्रणात आणायचा तरी कसा, असाच प्रश्न यंत्रणांपुढे उभा ठाकला आहे. मंगळवारी मुंबईमध्ये 3512 कोरोनारुग्ण आढळले होते. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी रुग्णसंख्येत 8 टक्क्यांनी भर पडली होती. बुधवारी मात्र रुग्णसंख्या धडकीच भरवून गेली. 




सध्याच्या घडीला मुंबईत जवळपास 25 हजारहून अधिक सक्रीय कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता, शहरात होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध आणण्यात आले आहेत. शिवाय गर्दीच्या ठिकाणी अँटीजन चाचण्या करण्याचा निर्णयही पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. 


Holi 2021 Celebration Guidelines: होळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून निर्बंध लागू


एकिकडे मुंबईचा आकडा अनेकांच्या मनातील भीती वाढवत असतानाच तिथं पुण्यातही परिस्थिती वेगळी नाही. बुधवारी पुणे जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 6741 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. ज्यामध्ये 42 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली. मुख्य म्हणजे इथंसुद्धा ही आजपर्यंतची एका दिवसात आढळून आलेली सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचीच दहशत पाहायला मिळत आहे. 


सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले देशातील 10 पैकी 9 जिल्हे महाराष्ट्रात


पुण्यात सर्वाधिक 43590 रुग्ण
नागपूर 33160
मुंबई 26599
ठाणे 22513
नाशिक 15710
औरंगाबाद 15380
(बंगळुरु शहर 10786) 
नांदेड 10106
जळगाव 6087
अकोला 5704