मुंबई : मुंबई हे शहरच गतीचं दुसरं नाव आहे. गेल्या काही महिन्यात कोरोना संकटाने मुंबईची ही गती कमी केली. मात्र मुंबई आता पुन्हा धावण्यासाठी सज्ज होत आहे. मुंबईत आज  मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या मार्गांवर मेट्रोची चाचणी सुरु होणार आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये मुंबईकरांच्या प्रवासासाठी मेट्रो खुली होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज या चाचणीला हिरवा कंदील दाखवतील.


असा असेल नव्या मेट्रोचा मार्ग 


कसे असतील नवे मेट्रो मार्ग?
मेट्रो 2A - डीएन नगर ते दहिसर 
18.6 किमी चा मार्ग - तरतूद 6, 410 कोटींची, 2031 पर्यंत 9 लाख प्रवासी प्रवास करतील 


मेट्रो 7- अंधेरी ते दहिसर 
16.5 किमीचा मार्ग- तरतूद 6,208 कोटींची, 2031 पर्यंत 6.7 लाख लोक प्रवास करतील...


या दोन मार्गांवर जी नवी मेट्रो धावताना दिसेल ती मेट्रो पूर्ण भारतीय बनावटीची आहे. शिवाय ही मेट्रो ड्रायव्हरलेस मेट्रो आहे. मुंबईच्या चारकोप डेपोमध्ये मेट्रो 7 आणि मेट्रो 2A चं सध्याचं कारशेड आहे. याच ठिकाणाहून मेट्रोची पहिली फेरी केली जाईल.


मुंबईत चार ते साडेचार वर्षांच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करणं हे आव्हानात्मक काम होतं. विशेषत: कोविड संकट आणि लॉकडाऊनमुळे मजुरांचं स्थलांतर हे या प्रकल्पातले मुख्य अडथळे ठरले.


मुंबईत पश्चिम उपनगरांत प्रवास करताना सर्वात कठीण प्रवास असतो तो पश्चिम द्रुतगती मार्गावरचा. या मार्गावरुन प्रवास करणारे मुंबईकर दररोज आपल्या आयुष्याचे अनेक तास हे प्रवासात आणि वाहतूक कोंडीतच घालवतात. मात्र, नवी मेट्रो  मुंबईकरांची ही सर्वात मोठ्या समस्येपासून सुटका करेल.


या नव्या मेट्रोमुळे मुंबईला काय फायदा?


- 18 ते 20 टक्के वाहतूक कोंडी कमी होईल


- 10 टक्के लोकलमधली गर्दी कमी होईल


- अंधेरी ते दहिसरचा प्रवास अवघ्या अर्धा तासात होणार


- नव्या मेट्रोचा प्रवासही किफायतशीर होणार


- नव्या मेट्रोचं किमान तिकीट 10 रुपये तर कमाल तिकीट 80 रुपये असणार


कसे असतील तिकीट दर?
0-3 किमी -10 रुपये
3-12 किमी - 20 रुपये
12-18 किमी - 30 रुपये
18-24 किमी - 40 रुपये
24-30 किमी - 50 रुपये
30-36 किमी - 60 रुपये 
36-42 किमी - 70 रुपये  
42-48 किमी - 80 रुपये 


या प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी 12 हजार कोटी प्रकल्पाचा खर्च आहे. त्यापैकी, आतापर्यंत साडेपाच ते सहा हजार कोटी खर्च झाले आहेत. बीईएमएल येथे तयार झालेल्या प्रत्येक कोचसाठी सरासरी 8 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या कोचच्या निर्मितीसाठी सरासरी 10 कोटी रुपये खर्च येतात. त्यामुळे ही स्वदेशी कोच निर्मिती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरलेली आहे. 


सध्या ट्रायलसाठी एक मेट्रो रुळावर चालवली जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण 10 मेट्रो ट्रेन मुंबईत दाखल होतील.


मुंबईची ही नवी मेट्रो मुंबईची नवी लाईफलाईन असेल यात शंकाच नाही मात्र, ही नवी लाईफलाईन सध्या असणाऱ्या मेट्रो आणि लोकल प्रवासाच्या तुलनेत नक्कीच आरामदायी ठरु शकेल.


मुंबई ही संकटकाळातही थांबली नाही याचं उदाहरण म्हणजे पूर्णत्वास जात असलेला हा नवा मेट्रो प्रकल्प आहे. कारण, आता जरी मुंबई कोरोनामुळे थोडीशी थांबली असली तरी भविष्यातली मुंबई धावतीच असणार आहे.