Maharashtra Mumbai News : मुंबईत (Mumbai) कालपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं अनेक भागांत झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच मुंबईतील दादरमधील प्रसिद्ध शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरात असणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Supremo Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस्थळाजवळ झाड कोसळलं आहे. काल (रविवारी) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं हे झाड कोसळलं आहे. मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आज (सोमवारी) सकाळी घटनास्थळी जाऊन याची पाहणी केली. 


रविवारी रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारात शिवाजी पार्क येथे असणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ असणारं झाड कोसळलं. कोसळलेलं झाड गुलमोहराचं होतं. विशेष म्हणजे, हे झाड स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी लावलं होतं. गुलमोहराचा हा वृक्ष  बाळासाहेबांनी साधारण 25 वर्षांपूर्वी लावला होता. झाड कोसळल्यामुळं स्मृतीस्थळाच्या कुंपणाचं नुकसान झालं आहे. मुंबई महापालिका प्रशासनानं या वृक्षाचं त्याच ठिकाणी प्रत्यारोपण करण्याचं ठरवलं आहे. 



एकीकडे बंडाळीनंतर शिवसेना समुळ हादरलेली आहे. शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. शिवसेनेत उभी फूट पडली असून दोन गटच पडले आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट. अशातच आम्ही शिवसेना सोडलेली नसून आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच असल्याचा दावा वारंवार शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून केला जात आहे. अशातच काल पावसामुळे शिवसेनाप्रुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरचा बाळासाहेबांनीच स्वतः लावलेला गुलमोहर वृक्ष मूळासकट उन्मळून पडला. शिंदे गटात सामिल झालेले स्थानिक आमदार सदा सरवणकर स्मृतीस्थळापासून हाकेच्या अंतरावर राहतात. तरिही ते स्मृतीस्थळावर फिरकलेही नाहीत, यावरुन शिवसैनिकांनी सरवणकरांवर टीकेची झोड उठवली आहे. 


पाहा व्हिडीओ : 


खरी शिवसेना कुणाची? राजकीय नाट्याचा दुसरा अंक आजपासून निवडणूक आयोगात


महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट शिवसेना कुणाची? यावरुन एकमेकांसमोर आहे. खरी शिवसेना कुणाची यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा दुसरा अंक आजपासून केंद्रीय निवडणूक आयोगात  रंगणार आहे. यावेळी शिवसेना पहिली मागणी स्थगितीचीच करणार असल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना आयोगाने निर्णयाची घाई करु नये अशी विनंती शिवसेना करणार आहे. शिंदे गटाला आयोगाकडे धाव घेण्याचा हक्क नाही अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. जे लोक आयोगासमोर आलेत त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांना आयोगाकडे दावा करण्याचा हक्कच नसल्याचा शिवसेनेचा युक्तीवाद आहे.