Mumbai BEST News : मुंबईची (Mumbai) 'लाल परी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टनं (BEST) काल आपली पंच्याहत्तरी साजरी केली. यानिमित्तानं बेस्टनं प्रवाशांसाठी एक नवी सेवा सुरु केली आहे. बेस्टनं प्रवाशांसाठी अनोखी 'चलो पे' सेवा (Chalo Pay Service) सुरू केली आहे. या सेवेमुळे आता प्रवाशांना बसमध्ये चढण्यापूर्वीच मोबाईल तिकीट खरेदी करण्याची गरज भासणार नाही. ते कोणत्याही बसमध्ये चढू शकतात आणि त्यानंतर त्यांच्या मोबाइलवरून तिकिटाचे पैसे देऊ शकतात. त्यांनी पैसे भरताच त्यांचे मोबाईल तिकीट अॅपवर जनरेट होईल. बेस्टची ही पेपरलेस तिकीट योजना प्रवाशांना फायदेशीर ठरणार असल्याचं बेस्टकडून सांगण्यात आलं आहे. 


'चलो पे' बेस्ट चलो अॅपवर उपलब्ध 


बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र म्हणाले की, "ही भारतातील पहिली पब्लिक ट्रांसपोर्ट केंद्रित पेमेंट प्रणाली आहे. 'चलो पे' नावाची ही सुविधा बेस्ट चलो अॅपवर उपलब्ध आहे. ही ऑफलाइन पेमेंट प्रणाली आहे, ज्यामुळे अनेक प्रवाशांना फायदा होईल."


'चलो पे' नं पैसे कसे द्याल? 


लोकेश चंद्रा यांनी सांगितलं की, "प्रवासी UPI, नेट बँकिंग, डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि इतर ऑनलाइन पेमेंटचा वापर करून मोबाइल वॉलेट रिचार्ज करू शकतात आणि नंतर त्यांच्या बस तिकिटांसाठी त्वरित पेमेंट करण्यासाठी चले पे वॉलेटमधील पैसे वापरू शकतात. यासाठी प्रवाशांना बस कंडक्टरला कळवावं लागेल की, त्यांना मोबाईलमधील चलो पे वापरून पैसे भरायचे आहेत. त्यानंतर प्रवाशांना मोबाईलमधील चलो पे वरील स्कॅनरच्या मदतीनं कंडक्टरकडे असलेल्या मशीनवरील QR स्कॅन कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर काहीच मिनिटांत मोबाईल तिकीट अॅपवर जनरेट होईल. 


बेस्टच्या संग्रहालयाचं उद्घाटन 


बेस्टनं काल (रविवारी) आपली पंच्याहत्तरी साजरी केली. याच निमित्तानं 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ बेस्टच्या जीएमच्या हस्ते बेस्टच्या इतिहासावर आधारित मिनी म्युझियमचं उद्घाटन करण्यात आलं. तसेच, विशेष रांगोळी कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं आहे. हे दोन्ही कार्यक्रम सोमवारी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात सर्वसामान्यांना पाहता येणार आहे.