Mumbai News : मुंबई महापालिकेने (BMC) मुंबईतील सर्व दुकानांवर ठळक अक्षरात मराठी पाट्या (Marathi Signboard) लावण्याचा निर्णय घेतला. सर्व दुकान मालकांना व्यापाऱ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत आपल्या दुकानांच्या पाट्या ठळक मराठीमध्ये करण्यासंदर्भात वेळही दिला. मात्र मुदत संपल्यानंतर सुद्धा अनेक दुकान मालकांनी आपल्या दुकानांच्या पाट्या मराठीत केलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यालायत गेले असताना सोमवारपासून (3 ऑक्टोबर) मुंबई महापालिका ठळक अक्षरात दुकानांच्या मराठी पाट्या नसलेल्या दुकान मालकांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.


दुकाने आणि आस्थापनांच्या नामफलकांवर सुरुवातीला मराठी भाषेत, देवनागरी लिपीत नाव लिहिणे आवश्यक आहे. तसेच इतर कोणत्याही भाषेत नाव लिहिले जाणार असेल, तर त्या भाषेच्या तुलनेत मराठीतील नाव हे मोठ्या आणि ठळक अक्षरांतच असले पाहिजे याबाबतचा शासन निर्णय 17 मार्च 2022 रोजी जारी करण्यात आला. त्यानंतर मुंबई महापालिकेने परिपत्रक काढून दुकान मालकांना यासाठी बराच वेळ सुद्धा देण्यात आला. मात्र या निर्णयाविरोधात फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन ही व्यापारी संघटना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे


बीएमसीकडून कशी कारवाई केली जाणार? 


- पहिल्या टप्प्यात दुकानांची पाहणी करण्यात येणार असून मराठी नामफलक बंधनकारक असल्याबाबत दुकानदार व आस्थापना यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 


- महापालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास दुकाने व आस्थापना कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल


- यासाठी मुंबईच्या दुकान व आस्थापना विभागाच्या 75 टीम विविध भागात कारवाई करण्यासाठी असतील


- नामफलक मराठीत नसल्यास महापालिका कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.


- नोटिशीनंतरही नामफलकात बदल न केल्यास न्यायालयाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई होईल. 


साडेचार लाखपैकी 50 टक्के दुकानांच्या पाट्या मराठीत
आता सोमवारपासून कारवाई होत असताना आणि मुंबई महापालिकेने मराठी पाट्या दुकानांच्या कराव्यात यासाठी तीन वेळा मुदत दिली असताना सुद्धा मुंबईतील साडेचार लाख दुकानांपैकी 50 टक्के दुकानांनी आपल्या पाट्या नियमानुसार ठळक अक्षरात मराठीत केल्या आहेत. इतर दुकान मालकांनी अजूनही मराठीत पाट्या न केल्याने ही दुकाने मुंबई महापालिकेच्या कारवाईच्या रडारवर असतील. ज्या दुकानांनी मराठी पाट्या केल्या नाहीत त्या दुकान मालकांचा सुद्धा रिअॅलिटी चेक एबीपी माझाने केला आहे.


अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा
मुंबई क्षेत्रातील सर्व दुकानांच्या पाट्या या ठळक अक्षरात मराठीत असाव्यात आणि त्यासाठी तीन वेळा मुदत देऊन सुद्धा ज्या पाट्या आता मराठीत नाहीत त्यांच्यावर सोमवारीपासून कारवाई केली जाणार आहे. तर दुसरीकडे काही व्यापारी संघटना या विरोधात आवाज उठवत सर्वोच्च न्यायालयात गेल्या आहेत आणि या कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र स्थगिती मिळेल तेव्हा मिळेल, त्याआधी तुम्ही तुमच्या दुकानांच्या पाट्या तातडीने ठळक अक्षरात मराठीत करुन घ्या अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा.