Pothole-free Roads in Mumbai : येत्या दोन वर्षात मुंबईच्या (Mumbai) रस्त्यांचा कायापालट होणार आणि मुंबईतले रस्ते अगदी गुळगुळीत होणार असं कुणी म्हटलं तर तुम्ही विश्वास ठेवाल का? पण सध्या तरी विश्वास ठेवण्यावाचून पर्याय नाही. कारण एकीकडे मुंबईतल्या खड्ड्यांनी (Potholes) हाडं खिळखिळी होत असताना प्रशासनाने रस्ते गुळगुळीत करण्याचं चॅलेंज घेतलं आहे तेही अवघ्या दोन वर्षात. 


काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी पदभार स्वीकारताच मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात धडक दिली. भर पावसाळ्यात मुंबईतल्या रस्त्यांची  चाळण बघून मुख्यमंत्र्यांनी यावर कायमस्वरुपी इलाज करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येत्या दोन वर्षात तब्बल 1000 किमी पेक्षाही जास्त लांबीचे रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. येत्या दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे मोठे पाऊल मानलं जात आहे.


दोन वर्षात नेमकं काय करणार?  


मुंबईत टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरण रस्ते बांधणी केली जात आहे. रस्ते देखील सुधारण्याच्या दृष्टीने सिमेंट काँक्रिटीकरणाला वेग देण्यात आला आहे. कारण सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून पर्यायाने परीक्षणाचा खर्च देखील कमी होतो.



  • महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत सुमारे 989.84 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. 

  • यंदा म्हणजे सन 2022-2023 मध्ये 236.58 लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम होत आहे. त्यासाठी 2 हजार 200 कोटी रुपयांचा खर्च होत आहे. 

  • तर आणखी तब्बल 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे, यासाठी एकूण 5 हजार 800 कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या निविदा निमंत्रित

  • तर उर्वरित आणखी 423 किलोमीटर लांबीची कामे पुढील वर्षी कामे हाती घेतली जातील

  • रस्ते कामांची माहिती देण्यासाठी बॅरिकेडवर क्यूआर कोड असतील

  • पदपथांवर दिव्यांग स्नेही रितीने असणार रचना

  • पावसाचे पाणी मुरण्यासाठी शोषखड्डे, गुणवत्ता नियंत्रणासाठी संस्थेची नेमणूक आणि सीसीटीव्ही कॅमेरे यासारख्या अभिनव तरतुदींचा निविदांमध्ये समावेश करण्यात आला आहे 


मुंबईत नव्याने निमंत्रित केलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये संयुक्त भागीदारी उपक्रमास परवानगी नाकारण्यात आली आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्गांची कामे करणाऱ्या मोठ्या आणि नामांकित कंपन्या या निविदा प्रक्रियेत सहभागी होतील, अशी महानगरपालिका प्रशासनाला अपेक्षा आहे. 


दोन वर्षात रस्त्यांचा दर्जा कसा राखणार?



  • मेकॅनाईज्ड स्लिप फॉर्म पेवर` (Mechanised Slip Form Paver) या अत्याधुनिक संयंत्राचा वापर करुन कमीत कमी कालावधीत सर्वोत्कृष्ट दर्जाची रस्ते बांधणी करण्याची अट

  • या सर्व रस्त्यांची प्रत्यक्ष कामे सुरु असताना त्याविषयीची सविस्तर माहिती नागरिकांना कळावी, यासाठी बॅरिकेडवर क्यूआर कोड देखील प्रकाशित केला जाईल. हा क्यूआर कोड स्कॅन करुन जनतेला संबंधित रस्ते कामाचा तपशील सहजपणे कळू शकेल. 

  • रस्ते बांधणी करताना त्यामध्ये अपेक्षित गुणवत्ता राखली जावी म्हणून देखरेख करण्यासाठी गुणवत्ता नियंत्रक संस्थाची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.  

  • कामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा दोष दायित्व कालावधी १० वर्षे राहणार आहे. रस्ते कामांचे देयक अदा करताना त्यातील २० टक्के रक्कम ही राखून ठेवली जाणार आहे