मुंबई : युवा सेना (Yuva Sena) कार्यकारणी सदस्य राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) अनावृत्त पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी सध्याची राजकीय परिस्थिती मांडली आहे. सोबतच मातोश्रीबद्दल असलेला आदर पत्रात मांडला आहे. 56 वर्षात अनेक वादळ पचविणारी ही शिवसेना आधीच्या प्रयत्नांनी संपली नाही, ती या गळालेल्या पालापाचोळ्यांनी कशी संपेल ? जिची मुळं खोल जनमानसांच्या हृदयात घट्ट रुजली आहेत, ती शिवसेना कशी सपेल ? बाळासाहेब ह्या एका शब्दांवर जीव देण्यास तयार शिवसैनिक असताना कशी संपेल? असं पत्रात म्हटलं आहे. 


पत्रात राहुल कनाल यांनी म्हटलं आहे की,  आदित्य साहेबांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाण्याचा योग आला. प्रत्येक पायरी चढतांना साहेब, असंख्य वेळा आपली ऐकलेली, पाहिलेली, अक्षरशः पारायणं केलेली तुमची भाषणं नजरेसमोरून तरळून गेली.  आपण हात ऊंचावून प्रचंड जनसमुदायास केलेलं आवाहन, लाखोंचा तो ऊत्फूर्त प्रतिसाद, शिवसेना, शिवसेना... हा आवाज. साहेब, भावनांनी कधी अश्रूंचं रूप घेतलं कळलंच नाही. नजरेसमोर फक्त अन् फक्त आपण, आपला तो झंझावात आणि थोरामोठ्यांकडून ऐकलेली, अनुभवलेली शिवसेना. अर्थात पण आज जे चाललय ते पहात असालच. एक सांगू साहेब, लहान तोंडी मोठा घास घेतोय. आपण असता ना, तर एकच वाक्य बोलला असता.. जाऊ दे रे, जे चाललेत त्यांना, ही आहे मराठी माणसासाठी लढलेली, हिंदूत्वाला वाहिलेली शिवसेना. ताकद आपली आहे तो सामान्य शिवसैनिक, त्याचा तो शिवबाचा बाणा. तो तर खंबीरपणे सोबत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 


56 वर्ष, शिवसेना नावाचा झंझावात, बाळासाहेब नावाचा दुमदुमता आवाज, आजही मनमनांना पेटवून उठतो, आव्वाज कुणाचा, म्हंटल्यावर चारी दिशांनी, साऱ्या आसमंतात, शिवसेना, हा एकच शब्द उमटतो. आज जे दिसतंय ना साहेब, त्याने वाईट जरूर वाटलं पण ऊद्धव साहेब फार सुंदर बोलले, सुकलेली, सडलेली, झाडाची गरज संपलेली पान उडाली, आता नवी पालवी, नवी पानं. मनाला उभारी मिळाली. अंगार पेटवणं, तो फुलवणं, हाच तर ठाकरी बाणा हीच तर खरी शिवसेना, सामान्यांची शिवसेना असं पत्रात म्हटलं आहे. 


शिवसेना ही फक्त पक्ष वा संघटना नाही, तो विचार आहे, जगण्याचा आचार आहे. 1966 साली आपण समस्त मराठी मनामनांत जागविलेला तो स्वाभिमानाचा खरा हुंकार आहे. परवा म्हणालं कुणी शिवसेना आता संपेल.. किव आली साहेब, 56 वर्षात अनेक वादळ पचविणारी ही शिवसेना आधीच्या प्रयत्नांनी संपली नाही, ती या गळालेल्या पालापाचोळ्यांनी कशी संपेल ? जिची मुळं खोल जनमानसांच्या हृदयात घट्ट रुजली आहेत, ती शिवसेना कशी सपेल ? बाळासाहेब ह्या एका शब्दांवर जीव देण्यास तयार शिवसैनिक असताना कशी संपेल? असं पत्रात म्हटलं आहे. 


साहेब, मी वयाने, पदाने लहान आहे पण आदित्य साहेबांसोबत वावरताना, उद्धव साहेबांना अनुभवतांना, मातोश्रीच्या भिंतींना हात लावतांना सारखं वाटतं, अचानक तुमचा आवाज येईल, काय रे ? बरं चाललंय ना ? कसं सांगू साहेब तुम्हांला, खरंच व्यापून टाकलंय तुम्ही तमाम शिवसैनिकांना, आम्ही आमचे उरलोच नाहीत साहेब. आमची शक्ती, आमची प्रेरणा.. फक्त शिवसेना. हा माझाच नाही साहेब, साऱ्या शिवसैनिकांचा अनुभव आहे, असंही पत्रात म्हटलं आहे.