केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच NCB ने मुंबईतील वांद्रे येथून एका महिलेला अटक केली आहे. ज्या महिलेने अंमली पदार्थ विकून कोट्यावधी रुपयांची माया जमवली आहे. एमडी हा अंमली पदार्थ विकून तब्बल 12 कोटी रुपयांची संपत्ती गोळा केली आहे अंमली पदार्थ तरुणांमध्ये म्याऊ म्याऊ म्हणून लोकप्रिय आहे.
रुबिना नियाज शेख असं या अंमली पदार्थ तस्कर महिलेचे नाव असुन मालेगावमध्ये तीन बंगला, मुंब्रा येथे फ्लॅट, कुर्ला येथे दुकान, वांद्रे येथे घर आणि माहिम कॉजवे येथे दोन खोल्या आहेत. रुबिना ही अंमली पदार्थ तस्कर दुनियेतील टोळींची सेकंड-इन-कमांड आहे. NCB ने तिच्याकडून 80 लाख रुपये आणि रुपये 30 लाख किमतीचे सोने देखील जप्त केले आहे. काही महिन्यांपूर्वी रुबीना मुंबईतून पळून गेली होती. पण NCB ला त्यांच्या खब-यांकडून माहिती मिळाली की, रुबीना शेख ही गुजरातमध्ये असून ती गुजरातमधील उंझाजवळील मीरा दातार येथून अटक करण्यात आली. मात्र तिचा बॉस निलोफर सांडोले अजूनही फरार आहे.
मुंबईत झोपडपट्ट्यांमधून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होते अशी माहिती NCB ला मिळाल्यानंतर ही विक्री रोखण्यासाठी NCB ने मोठे छापे घातल्यानंतर शेख आणि सांडोळे यांची नावे समोर आली. शेख हा केजीएन दर्गा लेन, वांद्रे येथील रहिवासी आहे. अंमली पदार्थांची तस्करी करून मिळवलेल्या पैशातून तिने तिथे घर खरेदी केले आहे. या शेखसाठी सुमारे 40 अंमली पदार्थ तस्कर काम करतात. ते मुख्यतः माहीम, वांद्रे, कुर्ला, कसाईवाडा, मुंब्रा आणि भिवंडी येथे सक्रिय आहेत, असा खुलासा तपासातून झाला आहे.
रुबीना ही गेल्या दहा वर्षांपासून व्यवसायात होती. मालेगावमधील तिझे प्रशस्त आणि आलिशान बंगल्यांची किंमत 2 कोटींपेक्षा जास्त आहे. तीन महिन्यांपूर्वी तिने कुर्ला येथे 50 लाख रुपयांना दुकान विकत घेतले होते. मुंब्रामध्ये, अमलीद नगरमधील धनश्री अपार्टमेंटमध्ये या रुबीना शेखचा फ्लॅट आहे. तिने माहिम कॉजवे येथील पांडुरंग चाळीत भाऊ, तिझी भाजी नगमा आणि तिझे सासरे यांच्या नावावर तीन खोल्याही देखील खरेदी केल्या आहेत. तर मीरा रोडमध्ये हीची काही मालमत्ता आहेत. तिच्या रिअल इस्टेटच्या मालकीची व्याप्ती किती आहे हे तपासण्याचे काम अजूनही सुरु असून समोर आलेली माहिती ही प्राथमिक चौकशीतून आलेली आहे जी अतिशय धक्कादायक आहे.
जेव्हा त्यांनी शेखला अटक केली तेव्हा एनसीबीने तिच्याकडून रोख, सोन्याचे दागिने आणि 109 ग्रॅम म्याव म्याव हे अंमली पदार्थ जप्त केले. NCB ने या प्रकरणात आणखी दोन जणांना अटक केली आहे. रुबीना शेख आणि सांडोळेची ते राहत असलेल्या भागात इतकी दहशत आहे की, त्यांच्या परवानगी शिवाय भागात त्यांच्या मर्जीशिवाय कोणी साधे घरे देखील विकून शकत नाही. रुबीनाचे वडील भू - माफिया असून त्यांचे चोरांचे मोठे नेटवर्क आहे. मोकळ्या भूखंडावर झोपड्या बांधायच्या आणि त्या विकायच्या हे काम ही टोळी करायची… आणि हाच मुख धंदा या टोळीचा होता पण नंतर सांडोळेला अंमली पदार्थ मिळू लागलं आणि शेखने त्यांची तस्करी करण्याची जबाबदारी घेतली.
माहीम दर्ग्याजवळ अल्पवयीन मुलांना अंमली पदार्थ विकल्याच्या प्रकरणात NCB ने सांडोळेला आरोपी बनवले आहे. तिच्या माहिम निवासस्थानावरही छापा टाकला आणि 2 लाख रोख तसच 250 ग्रॅम सोने जप्त केले आहे… सांडोळे ही सराईत अंमली पदार्थ तस्कर आहे तिला या आधी देखील मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. तर एनसीबीमध्ये रुबिना शेखविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे. मुंबई पोलिसांकडे तीन गुन्हे दाखल आहेत. शेख गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी गेली होती आणि तिला तिथून अटक करण्यात आली आहे.