मुंबई : वाढदिवस असो किंवा सणवार शुभेच्छांचे बॅनर झळकतात आणि याच बॅनरमुळे शहरं घुसमटत आबे. आता गणेशोत्सव संपला तरी बॅनर काही निघाले नाहीत. त्यामुळे राजकीय बॅनरकडे पालिका दुर्लक्ष करतेय का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. जी 20 साठी शहरे एवढी चांगली सजवली मग उत्सवांच्या काळात होर्डिंग्समुळे शहराचं विद्रुपीकरण का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
मुंबई शहरामध्ये ठिकठिकाणी अशाप्रकारे गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स अजूनही शहरात दिसत आहेत. गणेशोत्सव संपला तरीही राजकीय पक्षांकडून अजूनही शुभेच्छा देणारे बॅनर्स उतरवण्यात आलेले नाहीत. गणेशभक्तांना आकर्षित करण्यासाठी अनेक राजकीय पक्षांकडून अशाप्रकारचे बॅनर्स लावण्यात आलेले होते. मात्र, अद्यापही हे पोस्टर्स सर्वच मुंबईभर दिसत आहेत.
गणेशोत्सव संपला, मग बॅनर कधी उतरणार?
जी 20 च्या निमित्ताने पाण्यासारखा पैस खर्च करुन मुंबई सजवली होती पण राजकारण्यांच्या बॅनरमागे मुंबईची सुंदरता लपली गेली. गणेशोत्सव संपून चार- पाच दिवस उलटून गेले आहेत. तरीही शहरातल्या होर्डिंग्जबाबत मुंबई महापालिका काय करते आहे? असा प्रश्न निर्माण होतो. इतरवेळी होर्डिंग्जबाबत जागृक असलेली मुंबई महापालिका राजकीय पक्षांनी लावलेले बॅनर्स काढण्याबाबत इतकी उदासीन का? असा प्रश्न देखील निर्माण होतोय. मुंबई उच्च न्यायालयाकडून यासंदर्भात ताशेरे ओढल्यानंतरही पालिका गंभीर नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो.
राजकीय पक्षांच्या होर्डिंग्जबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कठोर भूमिका घेतल्याचं दिसतं. होर्डिंग्स संस्कृती संपवण्यासाठी सर्व पक्षीय एकत्रित येत ठोस भूमिका घ्यायला हवी अशी भूमिका देखील ट्विट करताना केली आहे. मुंबईतील अनधिकृत/विनापरवानगी असलेले बॅनर हटवण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. वेळोवेळी महापालिका अधिकृत बॅनरवर कारवाई करत असते.
राज ठाकरेंची कठोर भूमिका
शहरातील होर्डिंग्स याने शहर विद्रुप होतात असे ताशेरे न्यायालयाने ओढले होते. न्यायालयाच्या या मताशी मी पूर्ण सहमत आहे.मी या आधी म्हणलं तसं होर्डिंग संस्कृती जर सगळे राजकीय पक्ष बंद करणार असतील तर माझा पक्ष पहिला त्यात उतरेल. त्याच धर्तीवर या उत्सवातल्या काही खटकणाऱ्या गोष्टी दूर करायला संपूर्ण राजकीय व्यवस्था तयार असेल तर माझा पक्ष त्यात सगळ्यात पुढे असणार आहे.
लालबाग परिसर, वरळी, भायखळा, परळ, भांडूप परिसरात काही ठिकाणी अजूनही असे पोस्टर्स दिसत आहे. उत्सवांच्या काळात होर्डिंग्समुळे शहराचं विद्रुपीकरण का? असा प्रश्न उपस्थित होते. यासंदर्भात सर्वपक्षीयांनी एकत्रित येत होर्डिंग्ज संस्कृतीच्या आहारी न जाता ती बंद करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. बॅनर म्हणजे राजकारण्यांच्या प्रचाराचं माध्यम आहे. याच बॅनरमधून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राजकीय मंडळींकडून केला जातो. पण आता या बॅनरमुळे शहरंच गुदमरत आहे. बॅनरमुळे गुदमरलेल्या मुंबईची सुटका पालिका करणार का?