मुंबई/ नांदेड :  नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) चोवीस तासात नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. नांदेड मधील या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असताना विरोधी पक्षांनीदेखील सरकारवर ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. वारंवार महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवाशी खेळ सुरु आहे... अजून कितीदा पुन्हा पुन्हा हेच घडू देणार? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उपस्थित केला आहे. 


आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरवर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात चोवीस तासात २४ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समजली. त्यात १२ नवजात बालकांचा समावेश आहे हे अधिकच गंभीर आणि हादरवून टाकणारं असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यांनी पुढे म्हटले की, वेळेवर औषध पुरवठा न झाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागला असं समजतंय. हाफकिनने औषध खरेदी बंद केल्यामुळेच राज्यभरात सरकारी रुग्णालयात औषधांचा तुटवडा भासत आहे. मुंबईत देखील अनेक सरकारी आणि महानगरपालिका रुग्णालयांमधे औषधांची हीच परिस्थिती आहे आणि त्याचे परिणाम राज्यभरातल्या निष्पाप जनतेला भोगावे लागत आहेत. आम्ही ह्या विरुद्ध आवाज उठवला होता, पत्र लिहिलं होतं, KEM रुग्णालयावर मोर्चाही काढला होता. पण मिंधे सरकार ढिम्मच राहिलं असल्याचा आरोप आदित्य यांनी केला.  ठाण्यात हेच झालं, आता नांदेडला झालं... दिरंगाई, दुर्लक्ष आणि बेदरकारपणा ह्यामुळे वारंवार महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवाशी खेळ सुरु आहे... अजून कितीदा पुन्हा पुन्हा हेच घडू देणार? असा सवालही त्यांनी केला. 







आणखी 70 रुग्ण अत्यवस्थ, रुग्णांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज: अशोक चव्हाण


माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital) जाऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच, चोवीस रुग्णांचा मृत्यूनंतर रुग्णालयात असलेले आणखी 70 रुग्ण अत्यवस्थ असून, या रुग्णांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. 


नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी तातडीने रुग्णालयास भेट देऊन चौकशी केली. 24 मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश असल्याने या बातमीने खळबळ उडाली आहे. एवढे मृत्यू 24 तासात कसे झाले याबाबत चव्हाणांनी अधिष्ठातांकडून माहिती घेतली.