Bombay HC CJ Dipankar Datta : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी बढती करण्याची शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या निवेदनानुसार, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय उमेश ललित यांच्या अध्यक्षतेखाली कॉलेजियमची बैठक झाली.


सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमने 26 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्याची शिफारस केली आहे, असे निवेदनात म्हटले आहे. न्यायमूर्ती दत्ता यांची 22 जून 2006 रोजी कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठात कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. 28 एप्रिल 2020 रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली.


SC मध्ये न्यायमूर्ती पदांसाठी 34 मंजूर पदांपैकी 5 पदे रिक्त आहेत. न्यायमूर्ती दत्ता यांच्या नियुक्तीमुळे एकूण न्यायमूर्तींची संख्या 30 होणार आहे. सध्या मुंबईचे मुख्य न्यायमूर्ती मूळचे कोलकाता उच्च न्यायालयाचे आहेत.