मुंबई : मुंबईत (Mumbai News) पावसाचा जोर वाढल्यापासून पावसाळी आजारही चांगलेच बळावले आहेत. यामध्ये आठवडाभरात डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांची संख्या दुप्पट तर मलेरिया रुग्णांची संख्या दीड पटीने वाढली आहे. आठवडाभरात मलेरियाचे 721 ,  डेंग्यूचे 569 आणि गॅस्ट्रोचे 1 हजार 649 रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा तैनात ठेवली असली तरी मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. साथीच्या आजारांना थोपवण्यासाठी उपनगरीय रुग्णालयात 500 बेड्स तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच संध्याकाळी 4 ते 6 ओपीडी सुरू ठेवण्यात आली आहे.


मुंबईत जुलै महिन्यात कोसळलेल्या पावसानं पावसाळी आजारांनी पुन्हा डोकं वर काढलं आहे.  मुंबईत मलेरीया, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जुलै महिन्यात वाढ झाली आहे.  जुलै महिन्यात गॅस्ट्रोच्या एकूण 1649 रुग्णांची नोंद झाली तर मलेरियाचे देखील जुलै महिन्यात 721 रुग्णांची नोंद झाली होती.  जून महिन्यात देखील मलेरीयाचा प्रादुर्भाव होता. गेल्या महिन्यात  676 रुग्णांची नोंद झाली होती.  जुलै महिन्यात लेप्टोच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. लेप्टोच्या 377 रुग्णांची नोंद झाली तर  जून महिन्यात लेप्टोचे रुग्ण 97 होते. 


डेंग्यूने देखील जुलै महिन्यात डोकं वर काढलं आहे.  जुलै महिन्यात 579  रुग्णांची नोंद झाली आहे.  तेच डेंग्यूचे जून महिन्यात 353 रुग्ण आढळून आले होते.म्हणजे जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात रुग्ण वाढल्याचे पाहायला मिळाले.  चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत देखील जूनच्या तुलनेत वाढ होताना पाहायला मिळाली आहे. जून महिन्यात चिकगुनियाचे 8 रुग्ण होते तेच जुलै महिन्यात ही संख्या 24 वर पोहोचल्याचं दिसलं. पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबई पालिकेकडून लेप्टोसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या गेल्या होत्या.


डेंग्यू, चिकनगुनिया यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना



  • दर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवसा पाळावा. हौद, टाक्यांना नेहमी झाकण लावावे.

  • घरातील कुलर्समध्ये पाणी, फुलदाण्यातील, मनीप्लॅटमधील पाणी आठवड्यातून कमीत कमी एकदा बदलावे.

  • घरातील सांडपाण्यात अबेट (टेमीफॉस) हे डास अळी प्रतिबंधात्मक औषध टाकून घ्यावे. घरात/परिसरात पाणी साचू देऊ नये, वाहते करावे.

  • डास प्रतिबंधात्मक मलम, उदबत्त्या, वडया यांचा वापर करावा. अंगभर कपडे घालावे आणि मच्छरदाणीचा वापर करावा.

  • महानगरपालिकेतर्फे धूर फवारणी, औषध फवारणी, अॅबेट टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.

  • डेंग्यू, चिकनगुनिया हा आजार नोटीफायबल आजार असल्यामुळे रुग्ण आढळल्यास खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी 24 तासाच्या आत मनपा आरोग्य विभागास कळवणे बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा 1949 नुसार बंधनकारक आहे.

  • डेंग्यू, चिकनगुनिया या आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत महानगरपालिकेच्या नजिकच्या आरोग्य केंद्रावर, रुग्णालयात संपर्क साधावा.


हे ही वाचा: 


Dengue in Children : पावसाळ्यात लहान मुलांचा डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा