Mumbai Ghatkopar BEST Workers Agitation: मुंबईच्या (Mumbai News) घाटकोपर बेस्ट डेपोतील (Ghatkopar BEST Depo) बेस्ट बस कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारला आहे. पगारवाढ आणि बेस्टच्या सुविधा मिळत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. संप पुकारल्यानंतर आज सकाळी 9 वाजता हे सर्व कंत्राटी कर्मचारी आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे नोकरदार मुंबईकरांचे मात्र हाल होणार आहेत. 


बेस्टच्या घाटकोपर डेपो मधील कंत्राटी चालक आज सकाळपासून अचानक संपावर गेले आहेत. पगार वाढ, सुविधा, ओव्हर टाईम अशा विविध मागण्यांबाबत हे कंत्राटी कर्मचारी मागणी करत होते. या मागण्यांसाठी प्रज्ञा खजुरकर या सहकुटुंब आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी आणि आझाद मैदानात त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी या बेस्टच्या कंत्राटी कामगारांनीही हा स्ट्राईक केला आहे. मात्र याचा फटका चाकरमान्यांना बसणार आहे. सकाळी सकाळी कार्यालय गाठण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे नक्कीच हाल होणार आहेत. 



घाटकोपर बेस्ट डेपोतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अचानक संप; पगारवाढ, इतर सुविधांच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक


वेतनवाढ आणि इतर सुविधांच्या मागणीसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप 


बेस्ट ही मुंबईची दुसरी जीवितवाहिनी मानली जाते. दररोज शेकडोच्या संख्येनं मुंबईकर बेस्टनं प्रवास करतात. आज अचानकच घाटकोपर डेपोमधील एसएमटीएनएलच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या पगार वाढीची मागणी प्रलंबित आहे. त्यांना साधारणतः सध्या 16 हजार रुपये वेतन मिळत आहे. हे सर्व कर्मचारी त्यांचं हे वेतन 25 हजार रुपयांपर्यंत वाढवावं अशी मागणी करत आहेत. मात्र त्यांची ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच, पगारवाढीसोबतच इतरही सुविधा मिळाव्यात अशी मागणीही या कंत्राटी कर्मचाऱ्यांची होती, मात्र अद्याप ही मागणीही पूर्ण झालेली नाही. याच मागण्यासाठी घाटकोपर डेपोमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. 


पाहा व्हिडीओ : Best Contract Workers on Strike : बेस्टच्या घाटकोपर डेपोतील कंत्राटी कर्मचारी अचानक संपावर



घाटकोपर डेपोमधील साधारण 280 चालक आपल्या मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी अचानकपणे सुट्टीवर गेले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्टमध्ये तीन कंत्राटदारांच्या बस सेवा-चालक आहेत. त्यातील एका कंत्राटदाराचा अखत्यारीत असलेल्या वेट लीज कर्मचाऱ्यांनी/चालकांनी संप पुकारला आहे. संप पुकारलेले सर्व कर्मचारी डागा ग्रुपचे कंत्राटी कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. आपल्या मागण्यांवर हे सर्व कर्मचारी ठाम आहेत, तसेच जोपर्यंत आपल्या मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप सुरुच राहिल असा आक्रमक पवित्राही कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. 


दरम्यान, आज अचानक कंत्राटी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे घाटकोपरसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे.