मुंबई : एकीकडे मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे मुंबई पोलीस सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. जोगेश्वरी पूर्वेतील एमएमआरडीए कॉलनीतील गुन्हेगाराच्या राहत्या घरी गेल्या आठवड्यात वाढदिवस साजरा करताना व्हिडीओ समोर येत आहे. 


मुंबईत कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य सरकारने कोरोनाबाबत विविध निर्बंध घातले आहेत. त्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिसांचे असताना जोगेश्वरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस महेंद्र नेर्लेकर हे नियम धाब्यावर बसवत असल्याचे व्हिडीओ मध्ये दिसून येत आहे. एकीकडे सामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात असताना दुसरीकडे पोलीस अधिकारी सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस गर्दी करुन साजरा करत असल्याचे दिसून येत आहे.


जोगेश्वरी पोलीस स्टेशनचें वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र नेर्लेकर हे सराईत गुन्हेगार आणि सध्या जामीनावर असलेला आरोपी दानिश इष्टीखार सय्यद यांच्यासोबत केक कापताना व्हिडीओ मध्ये पाहायला मिळत आहे. या आरोपीवर गोरेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा क्रमांक 165/2018 अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम 307 खुनाचा प्रयत्न करणे, कलम 148 प्राणघातक हत्यारासह दंगा करणे, कलम 324 घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे, कलम 504 शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे अशा विविध प्रकारचे गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जोगेश्वरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी तलवार घेऊन फिरणे अशा गंभीर प्रकारच्या तक्रारी जोगेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. 


वरिष्ठ पोलिसांशी संगनमत असल्यामुळे गुन्हेगाराचा आत्मविश्वास वाढत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. अशा प्रकारामुळे मुंबई पोलिसांची प्रतिमेला डाग लागत असून प्रतिमा अजून मलिन होत आहे. काही ठराविक पोलिसांमुळे समस्त पोलीस खात्याची मान खालावत असल्याची अनेक उदाहरण यापूर्वी समोर आली आहेत. अशा पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी जनमानसातून होत आहे.


महत्वाच्या बातम्या :