Mumbai Cylinder Blast : "काळ आला होता पण वेळ आली नव्हती" या म्हणीचा प्रत्यय मुंबईतील (Mumbai) एका पोलिसाच्या घरी पाहायला मिळाला. मुंबईतील भायखळा पोलीस स्टेशनमध्ये  (Byculla Police Station) शिपाई पदावर काम करणारे विजय गोडेकर यांच्या घरावर मोठं संकट आलं होतं. परंतु दैव बलवत्तर म्हणून ते आणि त्यांचं कुटुंब या संकटातून बचावले. घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट ( Gas Cylinder Blast) झाला. या स्फोटात त्यांचं कुटुंब थोडक्यात बचावलं. परंतु घर उद्ध्वस्त झालं आहे.


पोलीस दलाचं मनोधैर्य कायम राहावं म्हणून ही घटनेची माहिती मिळताच मुंबईचे पोलीस आयुक्त (Mumbai Police Commission) विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) हे विजय गोडेकर यांच्या घरी पोहोचले, त्यांचं आणि कुटुंबियांचं सांत्वन करत पोलीस दलाकडून मदतीचं आश्वासन दिलं. एबीपी माझाशी बोलताना विवेक फणसाळकर म्हणाले की, घराची अवस्था फारच वाईट झाली आहे. कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना आश्वासन दिलं की, पोलीस दल त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत असून हरतऱ्हेची मदत केली जाईल.


विजय गोडेकर यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, त्यांनी काल (22 जुलै) दुपारी 12 च्या सुमारास गॅस सिलेंडर बदलला होता. पण तो कसा लीक झाला हे समजलं नाही. यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो. घरातले म्हणजेच आईष पत्नी आणि माझा मुलगा दोन वाजेपर्यंत घरात होते. त्यानंतर ते महालक्ष्मी मंदिरात गेले. संध्याकाळई सहाच्या सुमारास परत आले तेव्हा ही दुर्घटना त्यांच्या डोळ्यासमोर घडली.


तर विजय गोडेकर यांच्या पत्नी मानसी यांच्या माहितीनुसार, संध्याकाळी सहा वाजता त्या घरी पोहोचल्या आणि दरवाजा उघडून आत गेल्या. दुर्गंधी आल्याने त्या बाहेर आल्या आणि अचानक स्फोट झाला. हे सांगताना मानसी यांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण त्या थोडक्यात बचावल्या होत्या. या स्फोटात काहीही झालं अशतं. माझा मुलगा वाचला पण आमच्या मांजरीचं तोंड भाजलं.


विजय गोडेकर यांच्या आई शालन म्हणाल्या की, शेजारच्यांनी आपल्या घराच्या दरवाजाजवळ दिवा लावला होता. आम्ही घरी आल्यावर दरवाजा उघडताच गॅसचा आणि पेटत्या दिव्याचा संपर्क येऊन सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत माझी साडी देखील जळायला लागली. आजूबाजूच्या लोकांनी साडीला लागलेली आग विझवली तेव्हा आग लागल्याचं माझ्या लक्षात आलं.