Mumbai News :  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि  भाडेकरू कृती समितीचे अध्यक्ष कॉम्रेड मदन नाईक (वय 88) यांचे आज वृद्धपकाळाने विक्रोळी येथील राहत्या घरी आज सकाळच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाने भाडेकरू चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मदन नाईक यांच्या नेतृत्वातील भाडेकरू कृती समितीने अनेक भाडेकरूंना हक्काचा निवारा मिळाला. नाईक यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही सहभाग घेतला होता. कॉ. मदन नाईक यांच्या निधनाने पक्षाने एक सहृदयी मार्गदर्शक आणि ओजस्वी स्फूर्तिस्थान गमावले असल्याची भावना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने व्यक्त केली आहे. 'पथिक' हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक प्रसिद्ध झाले होते. 


नोकरीच्यानिमित्ताने कॉम्रेड नाईक हे कोकणातून मुंबईत आले होते. सुरुवातीला ते गिरगाव भागात राहत होते. कामगारांच्या परिसरात कम्युनिस्ट कलापथकांचे पथनाट्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमातून ते डाव्या चळवळीकडे ओढले गेले. कम्युनिस्ट कलापथकातही त्यांनी काही काळ काम केले होते. कॉ. नाईक यांनी औद्योगिक कामगारांसोबत बेघर आणि झोपडपट्टीवासीयांना संघटित करत त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न धसाला लावला. शहरी निवाऱ्याच्या प्रश्नी कॉ. मदन नाईक हे ज्ञानकोश मानले जात असत. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्विकासात त्यांचा तज्ज्ञ सल्ला उपयुक्त पडत असे. त्यांच्या निधनाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अतोनात नुकसान झाले असून विविध प्रश्नांवर मिळत असलेल्या त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाला मुकला असल्याची भावना माकपचे सरचिटणीस डॉ. उदय नारकर यांनी व्यक्त केली.


माकपचे ज्येष्ठ दिवंगत नेते, माजी आमदार प्रभाकर संझगिरी यांचे ते निकटवर्तीय समजले जात होते. संझगिरी यांच्यासोबत काम करत असताना कामगारांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलन केली. पुढे कॉम्रेड संझगिरी यांच्या नेतृत्वात झोपडपट्टीवासिय, चाळीतील रहिवाशांच्या प्रश्नांवर आंदोलने सुरू झाली. त्यात नाईक यांनी मोलाची भूमिका बजावली होती. भांडूप, विक्रोळी परिसरातील अनेक गरीब कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न त्यांच्या पुढाकाराने सुटला.  मुंबईत त्यांच्यासोबत भाडेकरूंच्या चळवळीत माजी आमदार सत्येंद्र मोरे, हेमकांत सामंत, सुशील वर्मा आणि इतर अनेक कार्यकर्ते सक्रिय होते. त्या काळात भांडुप, धारावी, अंधेरी इत्यादी भागात रहिवासी चळवळीचे अनेक मोठे लढे झाले व ते यशस्वी झाले. कॉ. मदन नाईक यांच्या रूपाने, ५५ वर्षांहून अधिक काळ पक्षाची सेवा केलेले एक अत्यंत समर्पित, निष्ठावंत, लढाऊ, अभ्यासू आणि प्रभावी नेतृत्व पक्षाने गमावले असल्याचे माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी म्हटले. 


मदन नाईक हे मराठी व हिंदीतील अत्यंत प्रभावी वक्ते होते. रहिवासी चळवळीपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत, कामगार चळवळीपासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून ते भगतसिंगापर्यंत अनेक विषयांवर त्यांचा अभ्यासू हातखंडा असायचा. सर्जनशील लेखक आणि कलावंत असलेल्या कॉ. नाईक यांचा मोठा जनसंपर्क होता. अभ्यासू आणि ओजस्वी वक्ते असलेल्या नाईकांनी भांडुप परिसरातील राजकारणातील भीष्माचार्य म्हणून लौकिक प्राप्त केला होता. अनेक पक्षोपक्षातील कार्यकर्ते त्यांना सन्मानाने वागवत असत. त्यांनी माकपच्यावतीने भांडूपमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती.