Mumbai News : मुंबईच्या चेंबूर येथील माहुलगावात रासायनिक पावडर सदृश पाऊस पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. त्यातच तिथल्या एचपीसीएलच्या प्लांटमधून रसायनिक पावडरची गळती झाल्यानं संपू्र्ण गावात ही पावडर पसरली होती. काल (शनिवारी) दत्त जयंतीनिमित्त भंडाऱ्याच्या जेवणात देखील ही पावडर मिसळल्याची भीती व्यक्त केली जात होती. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पालिका  अधिकारी गावात दाखल झाले होते. त्यावेळी एचपीसीएल कंपनीवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.  


अचानक पावडर सदृश केमिकलचा पाऊस पडू लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र थोड्याच वेळात जवळच असलेल्या एचपीसीएलच्या प्लांटमधून मोठ्या प्रमाणात कॅटलिस्ट पावडरची गळती झाली आणि ती विभागात पसरली असल्याचे समोर आलं. त्यामुळे पूर्ण गावात ही पावडर पसरली होती. गावात दत्त जयंती निमित्त असलेल्या भंडाऱ्या दरम्यान ही पावडर भाविकांच्या जेवणात गेली आणि सर्व भाविक भयभीत झाले.


पाहा व्हिडीओ : माहुलच्या गव्हाणगावात पावडर सदृश केमिकलचा पाऊस



या केमिकल पावडरमुळे आपल्या शरीरास कोणता धोका निर्माण तर होणार नाही ना? अशी भीती नागरिकांच्या मनामध्ये आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबई मनपाचे अधिकारी, अग्निशमन दल, आरसीएफ पोलीस या गावात दाखल झाले आणि त्यांनी पुढील चौकशी करून एचपीसीएलच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पण एचपीसीएलचे कोणतेही अधिकारी या ठिकाणी न आल्यानं नागरिक संतप्त झाले आहेत. जर या पावडरमुळे कोणाला काही नुकसान झालं तर त्याला एचपीसीएल पूर्ण जबाबदार असेल, अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. तर याबाबत एचपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी ही पावडर विषारी नसल्याचं आणि तसं काही झाल्यास दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब घावटे म्हणाले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :