Mumbai Police News : मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. मुंबईच्या हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी फोनवरुन देण्यात आली आहे. दरम्यान, हा फोन उल्हासनगरमधून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये धमकीचे फोन येण्याचं सत्र सुरुच आहे. पुन्हा एकदा धमकीचा फोन आला असून मुंबईतील प्रसिद्ध हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी या फोनवरुन देण्यात आली आहे. फोन आल्यानंतर तात्काळ ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याव्यतिरिक्त बीडीडीएस, कॉन्वेंट वेनलाही पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी हाजी अली दर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर, एल अँड टीच्या प्रोजेक्ट साइटची तपासणी केली. पण कोणालाच काही सापडलं नाही. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी धमकी आलेल्या फोनवर पुन्हा फोन केला, त्यावेळी तो फोन बंद आला. धमकी देणारा फोन नेमका आला कुठून? त्यामागे नेमका उद्देश काय होता? याचा तपास पोलीस करत आहेत. धमकीचा फोन करणारी व्यक्ती उल्हासनगरची असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचा फोन करणारी व्यक्ती मानसिक रुग्ण असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, धमकीचा फोन काल (3 नोव्हेंबर 2022) रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आला होता.