Mumbai News : जुनं भुयार सापडल्याची बाब कायमच कुतुहलाचा विषय ठरते. जणू इतिहासात जाण्याचाच तो मार्ग असतो. असंच एक भुयार मुंबईतील जुन्या सरकारी रुग्णालयात आढळल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील (Mumbai) सर जे जे रुग्णालयात (Sir J J Hospital) ब्रिटीशकालीन भुयार (Tunnel) आढळलं आहे. हे भुयार 130 वर्ष जुनं असून ब्रिटीशांनी ते बनवलं अशी माहिती समोर येत आहे. रुग्णालयातील डॉ. अरुण राठोड हे राऊंडवर असताना त्यांना हे भुयार दिसलं. जे जे रुग्णालयाकडून आर्किओलॉजी डिपार्टमेंटला आणि स्थानिक प्रशासनाला भुयारबाबत कळवणार जाणार आहे. हे भुयार डिलिव्हरी वॉर्ड ते चिल्ड्रन वॉर्डपर्यंत असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.


200 मीटर लांबीचं भुयार
जेजे रुग्णालयात जुन्या इमारतीच्या आत 200 मीटर लांबीचे भुयार सापडले आहे. जेजे रुग्णालयाच्या डीएम पेटिट इमारतीत जिथे सध्या नर्सिंग कॉलेज भरते तिथे एका निवासी डॉक्टरांना आणि सुरक्षारक्षकांना या भुयाराचा शोध लागला. डॉक्टर अरुण राठोड यांच्या निदर्शनास एक झाकण आलं. कुतूहल म्हणून हे झाकण उघडल्यानंतर एक लांबलचक पोकळी त्यांना दिसली आणि त्याच्या आतमध्ये एक भुयार असल्याचं समोर आलं. हे भुयार डी एम पेटिट आणि मोटली बाई या दोन्ही इमारतीला जोडणारे दोनशे मीटर लांब आहे. जे जे रुग्णालय परिसरात अशा प्रकारचे अनेक जुन्या इमारती आहेत त्यातील काही इमारतींना हेरिटेज वास्तूचा दर्जा प्राप्त आहे. अशाच या दोन्ही इमारतीला जोडणारे भुयार समोर आल्याने रुग्णालय प्रशासन आणि निवासी डॉक्टरांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.




मुंबईतील जुनं सरकारी रुग्णालय
मुंबईतलं सर जमशेदजी जिजीभॉय अर्थात जेजे रुग्णालय हे मुंबईतील जुनं सरकारी रुग्णालय आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात जे जे रुग्णालय प्रसिद्ध आहे. देशभरातून येणाऱ्या गरीब रुग्णांच्या उपचारासाठी हे रुग्णालय ओळखलं जातं. इतकंच नाही तर या रुग्णालयाने बॉम्बस्फोट, दंगल आणि दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या अनेक रुग्णांवर उपचार केले आहे. सोबतच या रुग्णालयात अंडरवर्ल्डने रक्तपातही घडवून आणला होता.


अशी झाली इमारतींची बांधणी
सर जे जे रुग्णालयाच्या इमारती 177 वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या होत्या. सर जमशेदजी जिजीभॉय आणि सर रॉबर्ट ग्रँट यांच्या सहकार्याने या इमारती उभारण्यात आल्या आहेत. 16 मार्च 1838 रोजी जमशेदजी जिजीभॉय यांनी या वास्तूच्या बांधकामासाठी एक लाख रुपयांची देणगी दिली होती. त्यानंतर 30 मार्च 1843 रोजी ग्रँट मेडिकल कॉलेजची पायाभरणी झाली. तर 15 मे 1845 रोजी ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जमशेदजी जिजीभॉय रुग्णालय वैद्यकीय विद्यार्थी आणि रुग्णांसाठी खुले झाले होते.


राजभवनात 2016 मध्ये भुयार आढळलं 
याआधी 2016 मध्ये मुंबईतील मलबार हिल इथल्या राजभवनातही ब्रिटिशकालीन भुयार आढळलं होतं. तब्बल सव्वाशे वर्षे जुनं असणारं 15000 चौरस फूट जागेतलं भलं मोठं भुयार (गुहा/बंकर) राजभवनच्या आवारात आढळून आलं होतं. तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. राज्यपालांनी हे भुयार उघडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भुयार खोदण्याचं काम हाती घेतलं. या भुयाराच्या पूर्व दिशेला असलेल्या प्रवेशद्वारासमोर बांधलेली भिंत तोडली. त्यावेळी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. भुयारात एकूण वेगवेगळ्या आकाराच्या 13 रुम सापडल्या. हे भुयार 20 फूट उंच आहे.