मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सर्वाधिक श्रीमंत लोक राहत असले तरी याच शहरात हजारो लोकांना उपाशी झोपावं लागतं. नेमकी हीच गंभीर बाब ध्यानात घेऊन 'अक्षय चैतन्य' यासेवाभावी संस्थेने भायखळ्यात महास्वयंपाकघर उभारले असून येथे दररोज तब्बल 25 हजार गरजू लोकांसाठी मोफत जेवण बनवले जाणार आहे.
सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल रुग्णांच्या नातेवाईकांना उपाशी रहावं लागू नये, यासाठी मुंबईतील 'अक्षय चैतन्य' ही सेवाभावी संस्था कौतुकास्पद कार्य करत आहे. संस्थेच्या केंद्रापासून 10 मैल त्रिज्येच्या परिसरात कुणीही उपाशी राहणार नाही, ही या संस्थेची शपथ प्रत्यक्षात उतरत आहे. कोणत्याही दिवशी तब्बल 25 हजार लोकांना जेवण देऊ शकेल अशा क्षमतेच्या या संस्थेच्या केंद्रीय स्वयंपाकघराचे (सेंट्रलाईज्ड किचन) उद्घाटन राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 4 मार्च रोजी होणार आहे. भायखळा येथील या महास्वयंपाकघराच्या उद्घाटन सोहळ्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव आणि मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त सुरेश ककाणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 'हरे कृष्ण मूव्हमेंट चॅरिटेबल फाऊंडेशन'चा उपक्रम असलेल्या 'अक्षय चैतन्य'ने मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय (डीएमईआर) यांच्यासोबत समन्वय साधून भूकमुक्तीसाठीच्या अन्नदानाचा हा उपक्रम राबवला जाणार आहे.
"रुग्णालयांतील केवळ रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठीच नव्हे, तर स्थलांतरित मजूर, झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे गोरगरीब आणि बालके यांचीही भूक मिटवण्यासाठी अक्षय चैतन्य त्यांना जेवण देणार आहे. अत्यंत गरीब घरच्या बालकांसाठी आम्ही शाळांमध्येही जेवण उपलब्ध (मील प्रोग्राम) करुन देणार आहोत," अशी माहिती 'अक्षय चैतन्य'चे सीईओ विकास परछंदा यांनी दिली.