Mahashivratri 2022 : 'महाशिवरात्री' निमित्ताच्या जत्रेसाठी शेतातील उभं पीक जेसीबीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त करत नष्ट केल्याबद्दल हायकोर्टानं (High Court) कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. तसेच कृष्णा-पंचगंगा संगमावरील 'कृष्णावेणी' जत्रा साजरा करण्यासाठी याचिकाकर्त्यांच्या जामीनीचा कोणताही भाग वापरण्यास मनाई केली आहे. 


राज्यात अजुनही कोविडचे निर्बंध लागू आहेत. अद्याप राज्य शासनानं उठवले नसतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रेला परवानगी दिलीच कशी? असा सवाल खंडीपीठानं जिल्हाधिकाऱ्यांना केला. अशाप्रकारे एखाद्याच्या शेतजमिनीत बेकायदेशीररीत्या घुसून पीक उद्ध्वस्त करत तिथं जत्रा भरवणं हे दुर्दैवी असल्याची संतप्त प्रतिक्रिया हायकोर्टानं दिली. या कारवाईआधी त्यांना रितसर नोटीस का दिली नाही?, अशा प्रकारच्या कुप्रथा आता थांबवायला हव्यात. हे कायद्याचे राज्य असून संबंधित विभागानं कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलं नसल्याचं इथं स्पष्ट दिसून येत असल्याचं निरीक्षणही हायकोर्टानं नोंदवलं. त्यामुळे यापुढे कायद्याचं पालन करण्याची सक्त ताकीद हायकोर्टानं जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना देत यंदा ही जत्रा याचिकाकर्त्यांच्या जमिनीवर यात्रा भरवण्यास नगरपालिकेस मनाई केली आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत सुनावणी 10 मार्चपर्यंत तहकूब केली.


काय आहे याचिका?


कोल्हापूर येथील कुरुंदवाड शहरातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी कृष्णावेणी जत्रा भरते. या जत्रेसाठी खाजगी जमिनी घेऊन त्यावर दहा दिवस जत्रा भरवली जाते. या जत्रेला शेती प्रदर्शन आणि जनावरांचं प्रदर्शन सुद्धा भरवलं जातं. या उभारणीसाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शशिकला सुरेंद्र अंबाडे यांच्या शेतात बळजबरीनं घुसत सोयाबीन आणि ऊसाचं उभं पीक उद्ध्वस्त केलं. त्याविरोधात अंबाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. कोणतीही नोटीस न देता नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यालगदच्या शेतात जेसीबी मशीन लावून याचिकाकर्त्यांचं पीक उध्वस्त केल्याची छायाचित्रही हायकोर्टात सादर केली. त्याची गंभीर दखल न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी सोमवारी संध्याकाळी कोल्हापूरचे जिल्हधिकारी आणि कुंरुदवाड नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश जारी केले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्हधिकारी राहुल रेखावार आणि कुरूंदवाडचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी व्हिसीमार्फत संध्याकाळी सुनावणीला हजेरी लावली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha