मुंबई :  मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका महिलेवर आधी टेम्पोमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

  आरोपीला घटनेच्या काही तासांच्या आत अटक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, शुक्रवारी पहाटे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला अमानुषपणे मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी रक्ताने माखलेल्या महिलेला महानगरपालिका प्रशासित राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.


मुंबईत निर्भयाची पुनरावृत्ती.. 32 वर्षीय महिलेवर टेम्पोमध्ये बलात्कार, अत्याचारानंतर अमानुषपणे मारहाण


पीडित महिलेची तब्येत खूप चिंताजनक


साकीनाका प्रकरणातील पीडित महिलेची तब्येत खूप चिंताजनक आहे. पीडिता सध्या आयसीयू मध्ये व्हेंटिलेटरवर आहे. झालेलं कृत्य अत्यंत क्रूर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. यात इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. मात्र यात जर तिच्या शरीराने साथ दिली तरच पीडित महिलेच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकेल, असं डॉक्टरांनी सांगितलंय.


 कठोरात कठोर शिक्षा केली जाईल गृहमंत्री : दिलीप वळसे पाटील


राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा केली जाईलच, पण त्यापुढे जाऊन यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा ही तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. तसा अहवाल वेळोवेळी पोलीस सादर करतील, असं वळसे पाटील म्हणाले.


दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी- देवेंद्र फडणवीस


या घटनेवर संताप व्यक्त करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील साकीनाका भागात निर्भयासारखी घटना ऐकून मन सुन्न झाले. कलम 144 फक्त गणेशभक्तांसाठीच का? असा सवाल त्यांनी केला आहे. वाढते महिला अत्याचार थांबविण्यासाठी कोणते कलम आणि केव्हा लावणार? असा सवाल करत दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. 


राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा-चित्रा वाघ 


भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की, एका आरोपीला आता अटक केली आहे. पण मला खात्री आहे की यात आणखी नावं समोर येतील. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिलांची बोटं छाटली जात आहेत, कुठं एफआयआर नोंदवली जात नाही. गणरायानं या सरकारला सद्बुद्धी द्यावी, महिला आणि मुलींवरील अत्याचारावर फक्त भाषणं करण्याऐवजी त्यावरील कायद्यांची प्रभावी अमलबजावणी व्हावी, असं वाघ म्हणाल्या.


शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे म्हणाल्या की, पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ती बेशुद्ध आहे. एक शस्त्रक्रिया झाली आहे. मध्यरात्री हा प्रकार झाला आहे. या प्रकरणी आरोपी देखील पकडला गेला आहे. हे क्लेषदायक आहे, संतापजनक आहे. वाईटातली वाईट शिक्षा त्या आरोपीला मिळाली पाहिजे. त्या महिलेला त्वरित मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू असं कायंदे म्हणाल्या.


महिलेची प्रकृती गंभीर - डॉक्टर
प्राथमिक तपासानुसार महिलेवर बलात्कार करण्यात आला असून तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की ही घटना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोच्या आत घडली. अधिकाऱ्याने सांगितले की वाहनाच्या आत रक्ताचे डाग देखील सापडले आहेत. डॉक्टरांच्या मते, महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.


आरोपीला भादंविच्या कलम 307, 376 अंतर्गत अटक करण्यात आली
काही पुराव्यांच्या आधारे आरोपीला भादंविच्या कलम 307 (खुनाचा प्रयत्न) आणि 376 (बलात्कार) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. घटनेसंबंधी पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.