Sameer Wankhede : मुंबई एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात समीर वानखेडे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुदत संपल्यानं त्यांची एनसीबीतून बदली करण्यात आली आहे. दरम्यान, कार्यकाळ संपल्यानंतर समीर वानखेडेंना मुदतवाढ मिळावी यासाठी भाजप नेते दिल्लीत लॉबिंग करत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. यावेळी नवाब मलिक यांनी एक कथित ऑडिओ क्लिप (audio clip) ऐकवत समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) निशाणा साधला होता.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच, एनसीबीचे झोनल डायरेक्टर आयआरएस (Indian Revenue Service) अधिकारी समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ संपला आहे. 31 डिसेंबरनंतर त्यांना मुदत वाढ न मिळाल्यानं ते आपल्या आयआरएस केडरमध्ये परत जातील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआरएस कस्टम आणि सेंट्रल एक्साईज असं केडर असलेले वानखेडे पुन्हा आपल्या खात्याच्या सेवेत रुजु होतील. एबीपी माझानं समीर वानखेडे यांना फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोनकॉल स्विकारले नाहीत.
एनसीबी अधिकाऱ्यांकडून पंचावर दबाव; मलिकांकडून कथित ऑडीओ क्लिप व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एनसीबीकडून पंचावर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी पत्रकार परिषदेत एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. एनसीबी अधिकाऱ्यांकडून जुन्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी पंचावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी एनसीबी अधिकारी आणि पंच यांच्या कथित संभाषणाची ऑडीओ क्लिप व्हायरल केली आहे.
नवाब मलिक यांनी व्हायरल केलेल्या क्लिपमध्ये एनसीबी अधिकारी मॅडी नावाच्या पंचाला पंचनाम्यात बदल करुन सही करण्यासाठी सांगण्यात आल्याचा दावा केलाय. नवाब मलिकांनी म्हटले की, ''मागील काळात बनवलेल्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी एनसीबीकडून पंचावर दबाव टाकण्यात येत आहे. एक मॅडी नावाचा पंच आहे. एनसीबीचा किरण बाबू नावाचा अधिकारी मॅडी नावाच्या पंचाला ऑफिसमध्ये न बोलावता ऑफिसबाहेर बोलावून पंचनामा बदलण्याबाबत बोलत आहे. तसेच अधिकारी पंचाला जुन्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी दबाव टाकत आहेत.'' मलिकांनी दावा केलाय की, समीर वानखेडे देखील त्यांना सही करण्याबाबत सांगत आहेत.
IRS चे दोन केडर कोणते?
IRS म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्विसचे दोन कॅडर आहेत. एक प्राप्तिकर म्हणजेच, Indian Revenue Service (Income Tax) हे कॅडर मिळालेल्या आयआरएस अधिकाऱ्यांची नियुक्ती सीबीडीटी म्हणजेच, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स Central Board of Direct Taxes (CBDT) या विभागात होते. तर दुसरं कॅडर आहे, इनडायरेक्ट टॅक्स किंवा कस्टम ड्युटी. Indian Revenue Service (Custom & Indirect Taxes) हे कॅडर मिळालेल्या आयआरएस अधिकाऱ्यांची नियुक्ती सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स आणि कस्टम्स Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) मध्ये होते. समीर वानखेडे याचं केडर हे अप्रत्यकर कर वसुलीचं म्हणजे, आयआरएस इनडायरेक्ट टॅक्सेस आणि कस्टम्स असं आहे.