CM Eknath Shinde On Samruddhi Mahamarg: महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकापर्ण रविवारी, 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाच्या पाहणी दरम्यान घडलेल्या प्रसंगाबाबत माहिती दिली. 'माझा कट्टा'वर बोलताना मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जुनी आठवण सांगितली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'माझा कट्टा'वर बोलताना मुंबई-नागपूर दरम्यान होणाऱ्या समृद्धी महामार्गाचा फायदा संपूर्ण राज्याला होणार असल्याचे सांगितले. हा महामार्ग राज्यात समृद्धी आणणारा असल्याचे सांगितले. राज्यासाठी समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. एमएसआरडीसी खाते माझ्याकडे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवायची आहे, असे सांगितले. त्यांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मु्ख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पात वन्यप्राण्यांची, पर्यावरणाची काळजी घेतली असल्याचे त्यांनी म्हटले. मुंबई-नागपूरमधील प्रवासाचे तास कमी होणार असल्याने त्याचा फायदा सगळ्यांना होणार असल्याचे सांगितले. इंधन बचतीशिवाय, मालवाहतुकीसाठी पूर्वीच्या तुलनेत लागणारा वेळ कमी लागणार असल्याचे त्यांनी म्हटले.
तेव्हा काळ उभा ठाकला होता...
समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना आलेल्या अनुभवाबाबत सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक प्रसंग सांगितला. समृद्धी महामार्गाची पाहणी करताना हेलिकॉप्टरमधून पुन्हा मुंबईच्या दिशेने येताना हवामान प्रतिकूल झाल्याने आम्ही अडचणीत आलो. त्यावेळी सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. त्यावेळी समृद्धी महामार्गाची जबाबदारी असणारे अधिकारी मोपलवार आणि इतर अधिकारी घाबरले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांची भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करत होतो, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यावेळी मस्करीत त्यांना तुम्ही किती जमिनी खरेदी केल्या आहेत, असे विचारले होते. मात्र, त्यावेळी अधिकारी देवाचा धावा करत होते, अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी सांगितले. परिस्थिती प्रतिकूल होती मात्र, होईल त्या प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी केली होती असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये:
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाची एकूण किंमत 55 हजार 335 कोटी रुपये इतकी आहे. या महामार्गावर प्राथमिक टप्प्यात 138.47 मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रस्तावित आहे. राज्यातील 10 जिल्हे, 25 तालुके आणि 392 गावांमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर 25 इंटरचेंज असून महामार्गालगत 18 नवनगरे असतील. महामार्गावर 30 मीटरपेक्षा जास्त लांबीचे 32 पूल असून लहान पुलांची संख्या 317 आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किमी असून रुंदी 120 मीटर (डोंगराळ भागासाठी 90 मी.) आहे. यात 3+3 अशा 6 मार्गिकांचा समावेश असून त्यावर वाहनाचा प्रस्तावित वेग प्रति तास 120 किमी असणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: