Maharashtra Samruddhi Mahamarg: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे (Maharashtra Samruddhi Mahamarg) लोकार्पण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. समृद्धी महामार्ग प्रकल्प पूर्णत्वास नेणे आव्हानात्मक होते. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची समजूत घालून महामार्ग पूर्णत्वास नेला असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. भूसंपादनासाठी विरोध करणारे शेतकरी कसे नरमले, याचा किस्साही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला. एबीपी माझा कट्ट्यावर (ABP Majha Katta) बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाला चालना देणारा असल्याचा विश्वास व्यक्त केला. 


एबीपी माझा कट्ट्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की,  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि मी एमएसआरडीसी मंत्री असताना या प्रकल्पावर काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी मुंबई-नागपूर हा 15 तासांचा प्रवास काही तासांवर आणण्यासाठी काम सुरू करण्यात आले.  बाळासाहेबांच्या संकल्पनेतून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे साकार झाला. त्यानंतर या 750 किमीच्या मुंबई-नागपूर महामार्गाला त्यांचे नाव देण्याचे ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले. जेएनपीटीपासून ते नागपूर प्रवासासाठी तीन तीन दिवस लागत होते. हा वेळ वाचणार आहे. मालवाहतूक करणारे ट्रक आणखी लवकर पोहचतील. त्याशिवाय, शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


शेतकऱ्यांचा विरोध कसा मावळला?


एमएसआरडीसी खाते माझ्याकडे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवायची आहे, असे सांगितले. त्यांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मु्ख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गासाठीच्या भूसंपादनासाठी विरोधदेखील झाला होता. नेमका हा विरोध का आहे, यासाठी मी स्वत: जमिनीवर उतरलो असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. काही शेतकऱ्यांचा खरोखर विरोध होता. काहींचा वेगळ्या कारणांसाठी प्रकल्पाला विरोध होता हे माझ्या लक्षात आले. विरोध होणाऱ्या बुलढाण्यात गेलो, त्यावर काहींनी प्रकल्पबाधितांनी याआधीच्या प्रकल्पाचा मोबदला मिळाला नसल्याचे सांगितले. या प्रकल्पाचा मोबदला तातडीने मिळेल असे आश्वासन दिले. या शेतकऱ्याची समजूत काढल्यानंतर त्याला अवघ्या चार तासांत मोबदला मिळाला. 


प्रकल्पाला ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध होता. त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना भेटलो. त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांची अडचण समजून घेतली. संवाद साधत यातून मार्ग काढण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. या ठिकाणी काही खूप अडचणी आल्यात. त्यातून मार्ग काढला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांची समजूत काढताना त्यांनी मिळालेल्या मोबदल्यातून इतर ठिकाणी शेतजमिन व त्याला पूरक व्यवसाय करता येईल, याची माहिती दिली. त्यानंतर प्रकल्पात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांनी इतर ठिकाणी शेती घेत, त्यातून विकास सुरू केला. तर, काहींनी दुकाने, इतर व्यवसाय सुरू केले. या प्रकल्पामुळे सर्वसामान्यांकडे समृद्धी आली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


पाहा व्हिडिओ: Majha Katta With Eknath Shinde : Samruddhi Mahamarg साठी मोठी कसरत करावी लागली