मुंबई: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा विषय मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केल्याने शिवसेनेने आता मुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपाटले आहेत. प्रकल्पग्रस्तांना आज मातोश्रीवर आमंत्रित करुन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर तुमच्या सुपिक जमिनी जाऊ देणार नाही, असे आश्वासन देत, तुमचा विरोध कायम ठेवा शिवसेना तुमच्या पाठीशी असल्याचे अश्वासन त्यांनी दिले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी आपली सर्व महत्त्वकांक्षा पणाला लावली आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनचं समृद्धी हायवे प्रकल्प पूर्ण केला जाईल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी आसनगावमध्ये आयोजित सभेत दिल्यानंतरही प्रकल्पबाधितांनी आपला विरोध कायम ठेवला आहे.

यानंतर उद्धव ठाकरे यांनीही शेतकऱ्यांची चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. त्यासंदर्भातच आज मतोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहापूरमधील शेतकऱ्यांना आमंत्रित केले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तुम्ही विरोध कायम ठेवा, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे असे अश्वासन शेतकऱ्यांना दिल्याने मुख्यमंत्री विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना ''आपण सरकारमध्ये सहभागी असलो, तरीही मी आणि माझा पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. तुम्ही तुमचा विरोध कायम ठेवा, शिवसेनेचा या विरोधाला पाठिंबा आहे,'' असे सांगितले.

तसेच विकासाच्या नावावर सरकारच्या वतीने प्रकल्पाच्या वेळी अनेक आश्वासने दिली जातात. पण काही करत नाहीत, असा टोला लगावाल. सध्या शेतकऱ्यांना त्यांच्या सुपीक जमिनी बळकावल्या जात असल्याचे वाटत आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्री आणि प्रकल्प समितीला भेटून शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवून यातून मार्ग काय काढता येईल, हे पाहणार आहोत. असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.