मुंबई : कोरोना संसर्ग चाचणीचे रिपोर्ट रखडवणार्‍या  बड्या लॅबवर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. या लॅबकडून कोरोना रिपोर्ट विलंबाने दिले जात होते. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता असल्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे. रिपोर्ट मिळायला विलंब होत असल्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणं कठीण होतं. त्यामुळे उपचारालाही विलंब होतो. काही प्रसंगी रुग्णाचा मृत्यू सुद्धा होतो, असं महापालिकेनं म्हटलं आहे.


मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोना चाचण्या करण्यासाठी पालिकेच्या चार, राज्य सरकारच्या चार आणि इतर खासगी अशा 25 लॅबच्या माध्यमातून कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. या लॅबनी कोरोना चाचणीसाठी स्वॅब सॅम्पल घेतल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे 24 तासांत किंवा जास्तीत जास्त 48 तासांत रिपोर्ट दिला पाहिजे, अन्यथा त्यांच्यावर बंदीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याआधीच दिला होता.


मेट्रोपॉलिस आणि इन्फेक्सन लॅबला रिपोर्ट देण्यास 55 तासांपेक्षा जास्त कालावधी लागत होता. या पार्श्वभूमीवर पालिका अधिकार्‍यांची पथके नेमून अचानक व्हिजिट करून खासगी लॅबच्या कारभारावर नजर ठेवण्यात येत आहे. यामध्ये मुंबईत सुमारे 20 शाखा असलेली 'मेट्रोपॉलीस' लॅब आणि मुंबईत सॅम्पल घेऊन ठाण्यात चाचणी करणारी 'इन्फेक्सन' लॅब रिपोर्ट देण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच पालिकेच्या माध्यमातून खासगी लॅबच्या कारभारावर यापुढेही देखरेख ठेवली जाणार आहे. मेट्रोपोलीसवर चार आठवडे बंदी तर ठाण्यात चाचणी करणाऱ्या इन्फेक्सनवरही एका आठवड्याची बंदी घालण्यात आली आहे.


ठाणे कल्याणमध्ये थायरोकेअर लॅबच्या टेस्टवर प्रश्नचिन्ह


ठाण्यातही या लॅबमधून आणलेले पाच जणांचे covid-19 चे रिपोर्ट पॉझिटिव्ह होते मात्र त्यानंतर महानगरपालिकेने केलेल्या चाचणीत तेच रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कारवाई करण्यात आली होती. या लॅबला ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चाचण्या न करण्याचे आदेश एका नोटीस द्वारे महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी दिले होते. ठाण्यानंतर आता कल्याण डोंबिवली महापालिकेकडून देखील थायरोकेअर लॅबवर कारवाई होण्याची चिन्हं आहेत. लॅबने चुकीचे रिपोर्ट दिल्याचा आरोप झाल्यानंतर केडीएमसीनं थायरोकेअर लॅबला नोटीस बजावली आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


कोरोनाचे चुकीचे रिपोर्ट! ठाण्यानंतर कल्याणमध्येही थायरोकेअर लॅबच्या टेस्टवर प्रश्नचिन्ह


कोविड पॉझिटिव्ह सांगितलेले रिपोर्ट निघाले निगेटिव्ह, ठाण्यात खाजगी लॅबवर कारवाई


दिलासादायक... भारतात कोरोनाचा समूह संसर्ग नाही, आयसीएमआरची माहिती