मुंबई : मालमत्ता कर वसुलीकरता मुंबई महापालिकेने थेट मुंबई मेट्रोवरच धडक कारवाई केली आहे. महापालिकेने मुंबई मेट्रो अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. डीएन नगर आणि अंधेरी वेस्ट येथे मेट्रो स्थानकांचा पाणीपुरवठा तोडला आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने यापूर्वी मुंबई मेट्रो 1 च्या 11 मालमत्तांना नोटीस पाठवली होती. यात आठ मेट्रो स्थानकांचाही समावेश होता.


मुंबई मेट्रोने 2013 पासून आजतागायत 117 कोटी 62 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे. थकित कराची रक्कम 21 दिवसांमध्ये भरण्याचे निर्देश यापूर्वीच्या नोटीसमध्ये देण्यात आले होते. या कालावधीत थकबाकीची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा न केल्यास या मालमत्तांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असा इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार आज डीएन नगर, अंधेरी वेस्ट येथे मेट्रो स्थानकाचा पाणीपुरवठा तोडण्यात आला आहे.


MMRDA आणि MMOPL यांच्यात मालमत्ता कोणी भरायचा यावरुन वाद असल्याने मालमत्ता कर भरलेला नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.


BMC Notice to Mumbai Metro : मुंबई मेट्रोनं कोट्यवधींचा मालमत्ता कर थकवला; 8 स्थानकांना महापालिकेची नोटीस


मालमत्ता कर वसुलीसाठी नोटीस बजावलेल्या मालमत्तांमध्ये आझादनगर मेट्रो स्थानक, डी एन नगर मेट्रो स्थानक, वर्सोवा मेट्रो स्थानक, एलआयसी अंधेरी मेट्रो स्थानक, पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानक, जे बी नगर मेट्रो स्थानक, एअरपोर्ट रोड मेट्रो स्थानक, मरोळ मेट्रो स्थानक या आठ स्थानकांचा समावेश आहे. यानंतरही कर न भरल्यास मलनि:स्सारण वाहिनी खंडित करण्यात येणार आहे. अखेर या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करण्यात येईल.


'या' दोन स्थानकांचा पाणीपुरवठा तोडला


- डीएन नगर स्थानक
- अंधेरी वेस्ट स्थानक


या स्थानकांना नोटीस


- आझादनगर स्थानक
- डी एन नगर स्थानक
- वर्सोवा स्थानक
- एलआयसी अंधेरी स्थानक
- पश्चिम द्रुतगती महामार्ग स्थानक
- जे बी नगर स्थानक
- एअरपोर्ट रोड स्थानक
- मरोळ स्थानक