BMC Budget 2023: मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह यांनी आज 52 हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडला. त्यामध्ये मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी, मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात दीड हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. 


मुंबईचा हवा प्रदूषण कमी करण्यासाठी हवा प्रदूषण नियंत्रण कृती योजना अस्तित्वात आणली आहे. पर्यावरणीय जबाबदारी ओळखून बीएमसी अर्थसंकल्पात यासंबंधित विशेष तरतूद करण्यात आली आहे. मुंबईचा वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्यांदाच दीड हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. खासकरून, दरवर्षी हिवाळ्यात हवा गुणवत्ता निर्देशांक खराब होतो. त्यामुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. 


बीएमसी ने दहिसर टोल नाका, मुलुंड चेक नाका, मानखुर्द, कलानगर जंक्शन आणि हाजी अली जंक्शन या सर्वाधिक गर्दीच्या पाच ठिकाणी हवा शुद्धीकरण यंत्र बसवण्याचे योजले आहे. नजिकच्या काळात 'नेट झिरो' चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वातावरण कृती आराखडा कक्ष (क्लायमेट ॲक्शन प्लॅन स्थापन ) करण्याचं काम प्रगतीपथावर असणार आहे.


कार्बनचा समतोल राखण्यासाठी विशेष पावलं उचलली जाणार आहेत, 


- शहरी वनीकरण उपक्रम हाती घेतला जाणार 
- राज्य शासनाच्या अभियानांतर्गत 35 इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे.
- महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहन तळामध्ये वाहन चार्जिंग प्रणाली उभारण्याकरिता बीएमसी सज्ज आहे.
- मुंबईची हवा प्रदूषण नियंत्रण कृती योजना अमलात आणली जाणार आहे. मुंबई स्वच्छ हवा उपक्रम यासाठी हाती घेतला जाणार.
- विविध क्षेत्रातील प्रदूषण केंद्रीकरण पातळीवर नियंत्रण ठेवणे.
- शहरासाठी बहुस्तरीय देखरेख धोरण सुरू करणे.
- नियोजनाची विकेंद्रीकरण करणे आणि नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जागृती निर्माण करून त्यांना प्रदूषणामुळे होणारा त्रास कमी करणे. अशा प्रकारच्या गोष्टींचा यामध्ये समावेश असेल.


बीएमसीच्या स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत 7 योजनांची घोषणा करण्यात आली आहे,


1) शाश्वत आणि स्वच्छ बांधकाम व निष्कासन पद्धती - यामध्ये बांधकामाच्या ठिकाणी धूळ प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अटी आणि बांधकामाच्या ठिकाणी धूळ कमी करण्यासाठी बांधकाम व्यवसायाकरता मार्गदर्शन तत्वे याचं पालन करावे लागणार.
2) रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी उपाय योजना.
3) वाहतुकीचे शाश्वत आणि पर्यावरणस्नेही उपाय योजना केली जाणार.
4) शाश्वत कचरा व्यवस्थापन उपाय योजना राबवली जाणार.
5) पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत शहरी प्रकल्प हाती घेतले जाणार.
6) प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी देखरेख केली जाणार
7) प्रदूषण कमी करण्यासाठी संपर्क आणि जागरूकता मोहिमा राबवल्या जाणार.