Mumbai Crime : मुंबई पोलिसांना (Mumbai Police) धमकीचे फोन कॉल येणं किंवा ई-मेल येणं आता जणू सामान्य बाब झाली आहे. मुंबईवर पुन्हा एकदा अतिरेकी हल्ला करण्याची धमकी मिळाली आहे. परंतु धमकी देणाऱ्याने यावेळी ट्विटर हॅण्डलचा वापर केला आहे. ज्यात मुंबईत 26/11 सारख्या हल्ल्यासारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली. 


मुंबई पोलिसांच्या ट्विटर टीमला काल (3 फेब्रुवारी) असा एक ट्वीट दिसला की रात्रीच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी लागली. सूत्रांच्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारीला @indianslumdog नावाच्या ट्विटर हॅण्डलचा वापर करत एका व्यक्तीने ट्वीट केला, ज्यात चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) याच्या 'the attacks of 26/11' चित्रपटाच्या पोस्टरचा वापर करण्यात आला. यात लिहिलं होतं की, "चित्रपटाचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होईल?"




सुरुवातीला हे ट्वीट कोणालाही आक्षेपार्ह किंवा संशयास्पद जाणवलं नाही. पण या ट्वीटला कोट करुन @ghantekaking नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन जे  ट्वीट करण्यात आलं, तेव्हा मुंबई पोलीस सतर्क झाले. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने तपास सुरु करुन शोध घेण्यास सुरुवात केली.


दुसऱ्या ट्वीटमध्ये काय लिहिलं होतं?




जे दुसरं ट्वीट होतं, ज्यात @ghantekaking ने मुंबई पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलिसांना टॅग करुन लिहिलं होतं की, "@indianslumdog हा गुजरातच्या सूरतमधील असून  26/11 हल्ल्याची चेष्टा करत आहे. त्याला वाटतंय की अशाचप्रकारचा हल्ला मुंबईत पुन्हा एकदा व्हावा, त्यामुळे याचा तपास व्हायला हवा." @ghantekaking ने पुढे दावा केला की, " @indianslumdog हे अकाऊंट कोण हाताळतं आणि त्याचं नाव तसंच इतर माहिती आपल्याकडे आहे."


@indianslumdog नावाचं ट्विटर हॅण्डल तूर्तास सस्पेंड




याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तपास सुरु केला. प्राथमिक तपासानुसार काहीही संशयास्पद दिसत नाही. पण दुसऱ्या व्यक्तीने असं ट्वीट का केलं आणि या दोघांचा काय संबंध आहे याचा तपास करत आहोत, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. दरम्यान @indianslumdog नावाचं ट्विटर हॅण्डल सध्या सस्पेंड केलं आहे.


मुंबईत दहशतवादी हल्ल्याची एनआयएला ई-मेलवरुन धमकी


दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) ई-मेलवरुन मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणाऱ्याने तालिबानचं नाव घेत धमकी दिली आहे.  मुंबईसह इतर शहरांवरही हल्ला करणार असल्याचंही या मेलद्वारे सांगण्यात आलं आहे. एनआयएने याची माहिती मुंबई पोलिसांना दिली असून पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे इतर यंत्रणांसह मुंबई पोलिसांनीही तपासाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत एनआयएने धमकीचे दोन ई-मेल आले आहेत.