Mumbai Budget: मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यंदाचा अर्थसंकल्प हा तब्बल 52 हजार कोटींचा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 6670 कोटी जास्त आहे. मुंबई महापालिकेचा (Mumbai Municipal Corporation) अर्थसंकल्प हा देशातील तब्बल आठ राज्यांपेक्षा मोठा आहे. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांचा डोळा महापालिकेच्या सत्तेवर आहे. 


मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा यांच्यासह इतर अनेक गोष्टींसाठी तरतुदी करण्यात आल्या. मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक असून येत्या काही महिन्यात महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. 


या राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेचे बजेट मोठं


देशातील त्रिपुरा, नागालँड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, सिक्कीम आणि गोवा या राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेचं बजेट मोठं आहे. त्यामुळे या राज्यांची सत्ता मिळवण्यासाठी ज्याप्रमाणे राजकीय पक्ष प्रयत्नशील असतात, त्याहून जास्त प्रयत्न मुंबई महापालिकेसाठी केला जातो.


मुंबई महापालिकेच्या ठेवी या 80 हजार कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यामुळे बजेट 52 हजार कोटी आणि मुदत ठेवी 80 हजार कोटी असे एकूण 1.32 हजार कोटींहून अधिक भांडवल असलेली मुंबई महापालिका ही आशियातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. 


भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच


मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील प्रमुख कंपन्यांची कार्यालयं ही मुंबईत आहेत. त्याचप्रमाणे देशातील सर्वाधिक कर हा मुंबईतून भरला जातो आणि या शहरातील अब्जाधीशांची संख्या ही शंभरहून जास्त आहे. त्यामुळे महापालिकेचं बजेटही मोठं आहे. तब्बल 52 हजार कोटी रुपयांचं बजेट असलेल्या मुंबईच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असतो. 


गेल्या 30 वर्षांपासून या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. सन 2014 सालच्या आधी मुंबई महापालिकेची सत्ता काहीही मिळवायचीच यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले गेले, सर्व शक्ती पणाला लावण्यात आली. पण शिवसेना-भाजप युतीने सत्ता कायम ठेवली. आता शिवसेना आणि भाजप युती तुटली असून हे दोन पक्ष मुंबईसाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. 


मुंबई महापालिका ही शिवसेनेचा श्वास असून तो कसाही करुन रोखायचा यासाठी भाजपने यंदा जोरदार कंबर कसल्याचं दिसून येतंय. शिवसेनेत पडलेली फूट आता सध्यातरी भाजपच्या पथ्यावर पडल्याचं दिसतंय. पण तरीही मुंबईचा गड कायम राखण्यासाठी शिवसेनेकडून नव्या राजकीय जोडण्या लावण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. 


ही बातमी वाचा: