मुंबई : ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या सेलिब्रेशनवर मुंबई महानगरपालिकेकडून निर्बंध लागण्याची शक्यता आहे. येत्या 20 तारखेपर्यंत मुंबई महानगरपालिका न्यू ईयर आणि ख्रिसमस साठीची नियमावली जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनच्या सेलिब्रेशनवरही महापालिकेकडून कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत.


सध्या मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात आली असून कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा 4 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे इथून पुढे मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. तसेच नव्या रुग्णांची संख्या आणि कोरोना दुपटीचा कालावधी यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासर्व बाबींचा सरासरी विचार केल्यानंतरच ख्रिसमस आणि न्यू ईयरसाठी नियमावली जाहीर केली जाईल.


पाहा व्हिडीओ : न्यू ईयरच्या सेलिब्रेशनवर कोरोनाचं सावट; बीएमसी नवीन निर्बंध लावण्याची शक्यता



गणपती, नवरात्री आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवरही मुंबई महानगर पालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्याचप्रकारची नियमावली ख्रिसमस आणि न्यू ईयरसाठी लागू करण्यात येणार आहेत. दिवाळीमध्ये सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. मरिन ड्राईव्ह किंवा वरळी सीफेस यांसारख्या ठिकाणी फटाके फोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने निर्बंध लावले होते. तसेच गर्दी करण्यास किंवा जमावाने एकत्र येण्यास बंदी होती. अशाच प्रकारची नियमावली मुंबई महापालिका ख्रिसमस आणि न्यू ईयरसाठी लागू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मुंबईतील पब, हॉटेल्सवरही मुंबई महापालिकेची करडी नजर असणार आहे. नाईट क्लब, हॉटेल्ससाठीही मुंबई महापालिकेकडून कडक नियम बनवले जाण्याची शक्यता आहे. अशातच मुंबई महापालिकेनं सध्या नाईट क्लब आणि हॉटेल्सवर धाडसत्र सुरु केलं आहे. अनेक ठिकाणी नियमांचं पालन होत नसल्याचं निदर्शनास येत आहे. अशा हॉटेल स्टाफसाठीही नियमावली लागू केली जाण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


BLOG | यंदाचा थर्टी फर्स्ट साधेपणाने!