वसई : वसईतील एका पठ्ठ्यानं आपल्या पत्नीला शोधण्यासाठी चक्क बाईक चोरी करत असल्याचा पोलीस तपासातून उघडं झालं आहे. सर्वसाधारण कुटुंबातील हा युवक आपल्या कौटुंबिक कलहामुळं परेशान होता. त्याची बायको त्याला सोडून गेली होती. बायकोला शोधण्यासाठी तो बाईक चोरी करत होता. बायको मिळाल्यानंतर चोरीची बाईक तेथेच सोडून द्यायचा, आतापर्यंत त्याने पाच बाईक चोरल्याचं तपासात उघड झालं आहे.


आरोपीचं नाव लहू लक्ष्मण राठोड असं आहे. तो आपल्या पत्नीला शोधण्यासाठी रस्त्यावर पार्क असलेल्या बाईक चोरायचा. बायको मिळाली की बाईक तेथेच ठेवून द्यायचा तसेच बाईक मधील पेट्रोल संपलं तरीही बाईक तिथेच ठेवून निघून जायचा. वसई विरार शहरात 'एक कॅमेरा शहरासाठी' या संकल्पनेतून दुकानदारांनी लावलेल्या कॅमेऱ्यात हा चोरटा कैद झाला आणि माणिकपूर पोलिसांच्या तावडीत सापडला.


17 ऑक्टोबर रोजी प्रणेश वर्तक यांची बाईक वसईतील दत्तात्रय शॉपिंग सेंटर समोरुन चोरीला गेलेली. वर्तक यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा फोटो हेरला आणि विशेष टीम नेमून आरोपीला बेड्या ठोकल्या. मात्र तपासात पोलिसांना धक्कादायक माहिती समोर आली.


आरोपी लहू राठोड हा मजूरीचं काम करायचा. त्याच्या चुलत्याने एकदा मोटारसायकल डायरेक्ट चालू केल्याने त्याने ती शक्कल लक्षात ठेवली. आरोपी राठोड कौटुंबिक कलहामुळं परेशान होता. त्याचं पत्नीबरोबर भांडण होत असल्याने त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. पत्नीला शोधण्यासाठी हा बाईक चोरायचा. बाईक मधील पेट्रोल संपलं किंवा बायको सापडली की हा बाईक तेथेच ठेवून द्यायचा. त्यानंतर पुन्हा आपल्या बायकोला शोधण्यासाठी बाईक चोरायचा. याला फक्त मोटार सायकली डायरेक्ट चालू करण्याची माहिती असल्याने हा स्कूटी न चोरता मोटारसायकली चोरायचा. माणिकपूर पोलिसांना यांना त्याने पाच बाईक चोरल्याची कबूली दिली आहे.