मुंबई : देशातील प्रतिष्ठीत आणि श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारसीनंतर मिलिंद नार्वेकरांची ट्रस्टचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे.
तिरुपती ट्रस्टच्या सदस्यपदी वर्णी लागावी म्हणून, देशभरातून मोठी चढाओढ असते. मात्र, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून ही नियुक्ती सुचवतात. याचप्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर मिलिंद नार्वेकरांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली. या नियुक्तीमुळं नार्वेकरांच्या खांद्यावरील जबाबदारी वाढली असून त्यांचं वलय देशपातळीवर विस्तारल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.
देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी काल (बुधवारी) आंध्र प्रदेश सरकारनं जाहीर केली आहे. या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची वर्णी लागली आहे. देशातील सर्वाधिक प्रतिष्ठित अशा आंध्र प्रदेशातील तिरूमला येथील तिरुपती देवस्थानाची ख्याती आहे. काल आंध्र प्रदेश सरकारनं अधिकृत अधिसूचना काढत, नवी तिरूमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकरांच्या नावाचा समावेश आहे.
दरम्यान, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर याआधीच मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग (MPL) आणि गवर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा आहेच. त्यानंतर आता देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. शिवसेना आणि मिलिंद नार्वेकर हे समीकरण राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असतं. अशातच आता मिलिंद नार्वेकरांनावर सोपवलेल्या या नव्या जबाबदारीमुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Exclusive : साहेब, 'दरेकर, लाड, महाजनांना गाडीत टाका आणि शिवबंधन बांधा', मिलिंद नार्वेकरांचा इरादा