Maharashtra Mumbai News : मुंबई महापालिका (BMC) निवडणुकांच्या तोंडावर सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी अनेक विशेष तरतुदींची घोषणा करण्यात आली होती. यापैकी एक महत्त्वाची घोषणा म्हणजे, 'सर्वांसाठी पाणी' धोरण. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर 'सर्वांसाठी पाणी' (New Water Policy) हे नवं धोरण महापालिकेनं जाहीर केलं असून आज या धोरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते पार पडणार आहे. गोरेगाव पूर्व येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यानात हा शुभारंभ सोहळा पार पडणार आहे. 


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज तब्बल 385 कोटी लिटर म्हणजेच, 3 हजार 850 दशलक्ष लिटर एवढ्या पाण्याचा पुरवठा करते. हा पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबईत सध्या 4 लाख 60 हजार अधिकृत नळजोडण्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र, असं असलं तरी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या काही प्रचलित आणि पूर्वीच्या नियमांमुळे विविध प्रवर्गातील झोपडपट्टयांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना नळजोडणी देता येत नव्हती. त्यामुळे अशा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आणि विशेष करुन महिला वर्गाला विविध अडचणींना सामोरं जावं लागत होतं. ही बाब लक्षात घेऊन आणि मानवीय भूमिकेतून विविध प्रवर्गातील झोपडपट्टयांमध्ये आणि निवासी इमारतींमधील रहिवाशांनाही नळजोडणी मिळावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'सर्वांसाठी पाणी!' या धोरणाची घोषणा करण्यात आली होती. या धोरणाचा शुभारंभ सोहळा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे. 


काय आहे महापालिकेचं 'सर्वांसाठी पाणी' धोरण?


मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी अर्थसंकल्पातून अनेक विशेष तरतुदींची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी एक म्हणजे, 'सर्वांसाठी पाणी'. याआधीही सत्ताधारी शिवसेनेनं 24 तास पाणी देण्याचं मुंबईकरांना आश्वासन दिलं होतं. मात्र याचा केवळ प्रायोगिक प्रकल्प मुलुंड-वांद्रे पश्चिममध्ये सुरु करण्यात आला. पण त्यानंतर तो बंद पडला. अशातच हे धोरण आखताना मुंबई महापालिकेनं त्यात मुख्यत: पाणीचोरी, अवैध जलजोडणी, पाणी गळतीवर नियंत्रण आणण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. हा उद्देश सफल होण्यासाठी पाणी माफिया, टँकरमार्फत होणारा पुरवठा रोखला जाईल, याची तजवीज केली जाणार आहे. तसेच, पालिकेने पाणी धोरण आखताना पाणीपुरवठ्यातील दोष दूर करण्याचं ठरविलं आहे.


मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून असमान पाणीवाटपाने मुंबईकरांमध्ये नाराजी आहे. त्या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयात सर्वांसाठी पाणी धोरणाची महत्त्वाची घोषणा केली होती. जाणून घेऊया या नव्या धोरणाबाबत... 


मुंबईची दैनंदिन पाण्याची गरज सुमारे 4,200 दशलक्ष लीटर असून सध्या होणारा पुरवठा 3,800 दशलक्ष लिटर आहे. पालिकेच्या जलविभागामार्फत पाणीपुरवठ्याचं नियोजन केलं जातं. दिवसामागे 25 ते 30 टक्के म्हणजे दररोज सुमारे 900 दशलक्ष लीटर पाण्याची चोरी, गळती होते. त्यामुळे मुंबईकरांना दररोज सुमारे 2,900 दशलक्ष लिटर एवढेच पाणी मिळतं. उर्वरित तूट भरून काढण्यासाठी पालिकेचं धोरण महत्त्वाचं ठरणार असल्याचं पालिका अधिकारी सांगतात. तसेच, मुंबईकरांना खाऱ्या पाण्यातून गोडं पाणी मिळणार आहे. मुंबईत खाऱ्या पाण्यापासून गोडं पाणी तयार करण्याच्या नि:क्षारीकरण प्रकल्पाकरता 200 कोटींती तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाद्वारे दिवसाला समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून 200 दशलक्ष लिटर गोडं पाणी मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. 


दरम्यान, 'गोरेगांव पूर्व' परिसरातील नागरी निवारा परिषदेच्या जवळ असणाऱ्या 'माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान' या ठिकाणी शनिवारी, म्हणजेच, आज सायंकाळी 6 वाजता हा सोहळा पार पडेल. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग–खनिकर्म–मराठी भाषा विभागांचे मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांचे मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन आणि संसदीय कार्य खात्यांचे मंत्री अॅड. अनिल परब, वस्त्रोद्योग-मत्स्यव्यवसाय-बंदरे या खात्यांचे मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यटन-पर्यावरण-राजशिष्टाचार खात्यांचे मंत्री तसेच, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याव्यतिरिक्त या कार्यक्रमाला स्थानिक खासदार गजानन कीर्तीकर, स्थानिक आमदार सुनिल प्रभू, आमदार सुनिल शिंदे, आमदार राजहंस सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी दिली आहे.