Iqbal Singh Chahal: मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांचा भारत सरकारचे सचिव या पदासाठीच्या निवडयादीत समावेश झाल्याची माहिती त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर शेअर केलीय. याचा अर्थ ते लगेचच केंद्रात प्रतिनियुक्तीवर जातील असं नाही. तर केंद्रात प्रतिनियुक्ती किंवा बदलीने जाताना त्यांची नियुक्ती भारत सरकारचे सचिव या पदावर होऊ शकते. भारत सरकारचे सचिव  प्रशासकीय सेवेतील हे सर्वोच्च पद समजलं जातं.  कुणाही आयएएस अधिकाऱ्यासाठी या पदावर नियुक्ती ही सर्वाधिक अभिमानाची बाब असते. सध्या मुंबई महापालिकेच्या आयुक्ताचा दर्जा राज्याच्या मुख्य सचिवांच्या बरोबर आहे. राज्याचे मुख्य सचिव ही राज्यातील सर्वोच्च प्रशासकीय पद आहे.


याबाबत माहिती देताना इक्बाल सिंह चहल म्हणाले आहेत की, ''मला हे सांगताना आनंद होत आहे की, भारत सरकारने मला केंद्रात सचिव पदाचा दर्जा दिला आहे. आयएएस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीतील या पदावर नियुक्ती ही सर्वाधिक अभिमानाची बाब.''


1989 च्या बॅचचे अधिकारी आहे इक्बाल चहल


इक्बाल चहल हे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं आहे. विविध पदांवर काम करताना त्यांनी जोरदार कामगिरी केली आहे. त्यांना प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे. चहल हे यापूर्वी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव होते. तसेच  जलसंपदा विभागातही त्यांनी प्रधान सचिव म्हणूनही काम केलं आहे. चहल यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिवपदीही त्यांनी काम केले असून, औरंगाबाद आणि ठाण्याचे जिल्हाधिकारीही होते.


इतर महत्वाच्या बातम्या: