मुंबई : भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात एका फेरीवाल्याने धक्काबुक्की केल्याची तक्रार नोंदवली आहे. तसंच ग्राहक महिलेने दिलेल्या नोटा फाडून आपल्या तोंडावर फेकल्या, असाही आरोप फेरीवाल्याने केला आहे. मुलुंड पूर्वेमधील संभाजी मैदान इथे हा प्रकार घडला.
आरोपानुसार, रविवारी (20 मे) संभाजी मैदान परिसरात सचिन मारुती खरात हा फेरीवाला भाजी विकायला बसला होता. सोमय्या सकाळी आठ वाजता त्याच्याकडे आले आणि धंदा न करण्यास बजावून निघून गेले. पण थोड्यावेळात सोमय्या पुन्हा तिथे गेले. मात्र फेरीवाला तिथेच होता. जागा रिकामी करतो, असं फेरीवाल्याने सोमय्यांना सांगितलं. परंतु किरीट सोमय्यांनी त्याला धक्काबुक्की केली. एवढंच नाही तर फेरीवाल्याला हटवताना खासदार सोमय्यांचं रागावरच नियंत्रण सुटलं. धंदा बंद करताना ग्राहक महिलेने दिलेल्या 150 रुपयांच्या नोटाही त्यांनी फाडून फेकल्या.
सोमय्यांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी आपल्याकडून साडेबाराशे रुपयांचा दंड घेतल्याचं फेरीवाल्याने सांगितलं. यानंतर फेरीवाल्याने सकाळी अकरा वाजता नवघर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
"सोमय्यांनी मला धक्का दिलाच, पण महिलेच्या हातातील भाज्यांची पिशवीही फेकून दिली. त्यांनी माझे पैसे फाडायला नको होते. ते माझ्या मेहनतीच्या पैसे होते. काही मुलुंडकर माझ्या बाजूने उभे राहिल्याने मी नवघर पोलिसात तक्रार दिली आहे," असं फेरीवाल्याने सांगितलं.