Mhada Lottery 2023 Mumbai :  मुंबई  गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (Mumbai Mhada) मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत अंधेरी, जुहु, गोरेगांव, कांदिवली , बोरीवली , विक्रोळी , घाटकोपर , पवई , ताडदेव , सायन , येथे विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या 4 हजार 83 घरांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली. म्हडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी  मिलिंद बोरीकर यांच्या हस्ते आज 'गो - लाईव्ह' या कार्यक्रमात हा शुभारंभ करण्यात आला. 


तसेच या ऑनलाइन अर्जांची संगणकीय सोडत ही 18 जुलैला निघणार आहे.  वांद्रे पश्चिम येथील  रंगशारदा नाट्यगृहात सकाळी 11.00 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. तसेच म्हडाकडून या घरांच्या सोडतीसाठी नियमावली , मार्गदर्शक सूचना,पात्रतेचे निकष आणि आरक्षण प्रवर्ग यासंबंधीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही माहिती https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.


115 अर्ज झाले प्राप्त 



आज जशी या ऑनलाईन अर्ज भऱण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली त्याचक्षणी 115 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती म्हाडाने दिली. नवीन सोडत प्रक्रिया ही अत्यंत सुलभ आणि सोपी केली असल्याने अधिकाधिक नागरिक यामध्ये सहभाग घेतील असा विश्वास म्हडाकडून व्यक्त करण्यात येत आहे. या सोडतीत  सहभाग घेण्याकरिता अर्जदारांना सात कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. 


अर्ज भरण्याची प्रक्रिया नेमकी कशी? 



1. 22 मे पासून रोजी दुपारी तीन वाजल्यापासून या ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. तर 26 जूनपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचा पर्याय नागरिकांसाठी म्हाडातर्फे खुला ठेवण्यात येणार आहे. 
2. 26 जून रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन रक्कम स्विकारली जाईल
3. तसेच 28 जून रोजी अर्जदार संबंधित बँकांमध्ये जाऊन  RTGS / NEFT द्वारे रक्कम भरु शकतात. 
4.   सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 4 जुलै रोजी दुपारी तीन वाजता म्हाडातर्फे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 
5. प्रारूप यादीवर अर्जदारांना 7 जुलै पर्यंत हरकत दाखल करता येईल. 
6. 12 जुलै रोजी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी दुपारी तीन वाजता म्हडाच्या https://housing.mhada.gov.in अधिकृत संकेस्थळावर जाहीर करण्यात येईल. 


 


एकूण 4083 घरांसाठी सोडत


म्हाडाने एकूण 4083 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2790 आणि अल्प उत्पन्न गटासाठी 1034 घरांची सोडत निघणार आहे. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता (EWS) वार्षिक सहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आवश्यक आहे. तर अल्प उत्पन्न गटाकरिता (LIG) वार्षिक नऊ लाख रुपयापर्यंत उत्पन्न आवश्यक आहे. दरम्यान गोरेगाव पहाडी परिसरातील पंतप्रधान आवास योजनेतील अत्यल्प गटातील 1947 घरांची किंमती प्रत्येकी अडीच लाखांचे अनुदान वजा करुन 30 लाख 44 हजार ते 40 लाख रुपयांपर्यंत आहेत.