Jayant Patil ED:  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) जयंत पाटील (Jayant Patil) यांची दुपारी सव्वा बारा वाजल्यापासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. IL & FS प्रकरणी ईडी जयंत पाटील यांचा जबाब नोंदवत आहे. ईडीचे तीन अधिकारी जयंत पाटलांची चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीने जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या चौकशीविरोधात मुंबईसह विविध ठिकाणी निदर्शने केली. 


ईडीने बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर अखेर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडी चौकशीला सामोरे गेले. परंतु ते जाण्यापूर्वी मोठया प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी ईडी कार्यालय आणि राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर पाहिला मिळाली. ईडी चौकशीविरोधात  मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर तंसच इतर जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. बरेच पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईला येऊ नये  असं आवाहन जयंत पाटील यांनी सकाळी ईडी चौकशीला जाण्यापूर्वी केले होते. 


आरोप काय?


जयंत पाटील यांच्यावर आयएल अँड एफएस कंपनीशी संबंधित गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील काही वर्षांपूर्वी नोटीस देण्यात आली होती. या प्रकरणी दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेने पहिल्यांदा गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर गुन्ह्यातील आर्थिक व्यापती पाहता ईडीने हे प्रकरण आपल्याकडे घेतले होते.


नेमकं प्रकरण काय?


- 2008 ते 2014 या कालावधीत रस्ते उभारणीच कॉन्ट्रॅक्ट संबंधित कंपनीला देण्यात आलं होतं. 


- संबंधित कंपनीकडून सब कॉन्ट्रॅक्टरला कंत्राट देण्यात आलं. सब कॉन्ट्रॅक्टरने कथितरित्या जयंत पाटील यांच्याशी निगडित कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे. 


- ज्यावेळी हे पैसे देण्यात आले त्यावेळीं जयंत पाटील राज्याचे गृहमंत्री होते.