Weather in Maharashtra : महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर हवामान बदल होताना दिसून येत आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. आता पुन्हा विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भात पावसाचा जोर जास्त असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. दुसरीकडे मुंबईत तापमानात घट झाली असली तरी वाढलेली आर्द्रता घाम फोडत आहे. मुंबईत सध्या प्रचंड उकाडा वाढलेला असताना विदर्भात मात्र अवकाळी पावासाचं संकट उभं ठाकलंय. नागपूर वेधशाळेनं हा इशारा दिलाय.  त्यामुळे एकीकडे प्रचंड उकाडा तर दुसरीकडे पाऊस असं विचित्र वातावरण सध्या राज्यात दिसून येतंय. मान्सून दाखल होईपर्यंत ही विचित्र परिस्थिती कायम राहणार असल्याचं वेधशाळेनं म्हटलं आहे.


पुढील 4 ते 5 दिवस राज्यात विविध जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर काही ठिकाणी ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी घामाच्या धारा निघत आहेत. मुंबईसह काही नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत.






हवेतील आर्द्रता वाढल्याने वातावरण ढगाळ राहील. राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल मात्र तीव्रता कमी असेल. पुढील आठवडा पुण्यातील वातावरण अंशतः ढगाळ असणार आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने वातावरण ढगाळ राहील. रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सरासरी किंवा त्यापेक्षा कमी राहील त्यामुळे अस्वस्थ वाटू शकते., असे आयएमडी पुणे येथील शिल्पा आपटे यांनी सांगितले.  


या वातावरणात काय काळजी घ्याल? तेही शिल्पा आपटे यांनी सांगितलेय. 


- ११-४ घराबाहेर पडू नये 
- पाणी पिऊन बाहेर पडावे 
- सोबत पाण्याची बॉटल ठेवावी 
- उन्हातून आल्यावर सावलीत थोडी विश्रांती घेऊन मग पाणी प्यावे 
- उन्हातून एकदा ए सी मध्ये जाऊ नका



हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस  -


हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली आणि सेनगाव तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या झालेल्या पावसामुळे शेतामधील भुईमूग त्याचबरोबर भाजीपाला वर्णीय पिके आणि फळबागांचे नुकसान झाले. तर या पावसामुळे उकड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय.


नाशिकमध्ये धो धो - 


नाशिकमध्ये आज पावसाने हजेरी लावली. मालेगावला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसलाय. मालेगाव तालुक्यातील कजवाडे व सटाणा तालुक्यातील नामपुर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कांदा पिकांसह शेतिपिकांचे पुन्हा नुकसान झालेय.


 वादळी वाऱ्यासह बारामती शहर आणि परिसरात अवकाळी पावसाला सुरुवात
आज सायंकाळी बारामती शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सायंकाळी सात वाजता सुरुवात झाली. गेल्या काही दिवसापासून या परिसरात उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यामुळे उकाडा  मोठ्या प्रमाणात जाणवत होता. आज सायंकाळी वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण तयार झाले आणि सात वाजता वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली.


भंडाऱ्यात 44@ विक्रमी तापमानाची नोंद....कडक उष्णतेपासून सावधगिरी बाळगण्याचं प्रशासनाचं आवाहन. 


 मागील महिनाभरापासून अवकाळी पावसाने भंडारा जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण होऊन तापमानात मोठी घट झाली होती. आता सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच तापमानानं आता पुन्हा डोकं वर काढलं आहे.  आज भंडारा जिल्ह्यात या ऋतूंमधील सर्वाधिक विक्रमी 44 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.  भंडारा जिल्ह्यातील आजचा दिवस सर्वाधिक उष्णतेचा दिवस असल्यानं जिल्हा प्रशासनानं नागरिकांना स्वतःसह पाळीव जनावरांची ही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. उष्णतेपासून बचाव व्हावा यासाठी नागरिकांनी दुपट्टे, टोपी चा सहारा घेतला. सोबतच नागरिकांनी लिंबूपाणी, शीतपेय आणि कुलर, एसी चा सहारा घेतल्याचे बघायला मिळाले.