Mumbai MHADA Lottery : मुंबईत (Mumbai News) हक्काचं घर विकत घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गियांसाठी मोठी बातमी. म्हाडाच्या (MHADA Mumbai) मुंबईतल्या चार हजार घरांची सोडत एप्रिलमध्ये निघण्याची दाट शक्यता आहे. गेल्या चार वर्षांपासून रखडलेली ही लॉटरी (MHADA Lottery) प्रक्रिया आता सुरळीत होण्याचा अंदाज आहे. 


म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष मिलिंद बोरीकर यांच्या माहितीनुसार गोरेगावमधल्या म्हाडाच्या दोन मोठ्या प्रकल्पांना एप्रिल महिन्याअखेर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळणार आहे. ओसी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर गोरेगावसह अन्य विभागातील घरांची सोडतही जाहीर केली जाईल.तसंच रहिवाशांना घरांचा ताबा देण्यासाठी इतर विभागाची मान्यताही मिळाली आहे. मात्र काही विभागांकडून परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.


म्हाडाच्या मुंबईतल्या घरांसाठी तब्बल चार वर्षांनी सोडत निघणार आहे. यापूर्वी 2019 मध्ये मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी सोडत निघाली होती. गेल्या चार वर्षांपासून रखडलेली सोडतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं, असं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी घर घेण्याची ही मोठी संधी आहे. म्हाडाच्या वतीनं तब्बल 4 हजार घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. या सोडतीत सर्व गटांतील घरांचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक 2638 घरांचा प्रकल्प गोरेगावमध्ये आहे. तर त्याव्यतिरिक्त कन्नमवार नगर, वांद्रे, बोरिवली आणि मागाठाणे परिसरातील घरांचाही या लॉटरीमध्ये समावेश असणार आहे.  दरम्यान, कोकण बोर्डाकडून 4, 664 घरांसाठी 10 मे रोजी लॉटरी जारी करण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली असून आत्तापर्यंत 33 हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे.


45 लाख किंमत


म्हाडा गोरेगाव येथील 'प्लॉट ए' आणि 'प्लॉट बी' येथे दोन प्रकल्प उभारले जात आहेत. लिंक रोडवरील मेट्रो स्टेशनजवळ, प्लॉट ए, या प्रकल्पात इकॉनॉमी वीकर सेक्शन (EWS) मध्ये प्रत्येकी 23 मजल्यांच्या सात इमारतींचा समावेश आहे. यामध्ये 322 चौरस फुटांची 1239 घरं आहेत. तर, एसव्ही रोडजवळील 'प्लॉट बी'वर, 4-4 इमारती EWS आणि LIG (लोअर इन्कम ग्रुप) च्या आहेत. त्यांची अनुक्रमे 708 आणि 736 घरांचा समावेश लॉटरीत करण्यात आला आहे. गोरेगावमध्ये EWS घरांच्या किमती 35 लाखांपर्यंत असल्याचा अंदाज आहे. तर, एलआयजी घरांच्या किमती 45 लाखांपर्यंत जाऊ शकतात. सध्या एमआयजी आणि एचआयजी घरं बांधली जात आहेत.