Dr. B.R. Ambedkar Jayanti 2023 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B.R. Ambedkar Jayanti) यांची आज 132 वी जयंती आहे. त्यानिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. चैत्यभूमी परिसरात मुंबई महानगर पालिकेकडून सुशोभीकरण आणि अनुयायांसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर उत्साह पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रॅली काढून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी सलग 18 तास अभ्यास करुन त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. दरम्यान, चैत्यभूमी परिसरात महानगरपालिकेकडून योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपणासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत लेजर शो आणि छायाचित्र प्रदर्शन दाखवण्यात येणार आहे. यंदाच्या जयंती दिनानिमित्त नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यंदा प्रथमच अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आयोजित एका विशेष लेजर शो चे आयोजन माता रमाबाई व्ह्युईंग डेक येथे सायंकाळी करण्यात येणार आहे. बीएमसीकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
बुलढाण्यात आंबेडकर जयंतिनिमित्त फटाक्याची आतिषबाजी
बुलढाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जन्मोत्सवाचे स्वागत 13 एप्रिल च्या मध्यरात्री 12 वाजता फटाक्याच्या आतिषबाजीने करण्यात आले. स्थानिक जयस्तंभ चौकात शहरातील हजारो युवक जमले होते. तेव्हा मोठ्या प्रमाणात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. तसेच घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. ही फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
परभणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त परभणीत विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 7.30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर महावंदना होणार आहे. या वंदनेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित राहणार आहे.
धुळे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शहरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आंबेडकरी अनुयायांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर अभिवादन केले जाणार आहे. तर शहरातील संदेश भूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्श झाला आहे.
चंद्रपूर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात रॅली काढून अनेक संघटना बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करतात. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतील.
वर्धा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वर्धा शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आंबेडकर चौकामध्ये विविध रॅली आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. पहाटेपासूनच आंबेडकर अनुयायी अभिवादन करण्यासाठी पोहोचत आहेत.