Mumbai Metro: मुंबईतील मेट्रो 7 आणि मेट्रो 2अ चं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. मेट्रो 7 दहिसर ते अंधेरी तर मेट्रो 2 अ दहिसर ते डीएन नगर धावणार आहे. ज्यामुळे पश्चिम उपनगरांवरील वाहतुकीचा ताण हलका होईल. मुंबई आणि उपनगरात येत्या काही वर्षात 14 मेट्रो धावताना बघायला मिळतील.  


मेट्रो म्हणजे गारेगार प्रवास आणि वेळेची बचत. मुंबई मेट्रो ही मुंबईतील वाहतूक कोडींवर मोठा पर्याय समोर आला होता. मात्र, कधी निधीची कमतरता, कधी कालावधी वाढण्यासारख्या समस्यांचा सामोरे जाताना 2014 साली पहिली मुंबई मेट्रो मुंबईकरांना मिळाली. मात्र, मेट्रोच्या अवतीभवती राजकारण फिरल्याचं नेहमीच बघायला मिळालं. 


मेट्रो-1 चं उद्घाटन होण्याआधीच मेट्रोच्या नावावरुन राजकारण रंगताना दिसलं. रिलायन्स मेट्रोच्या नावाला शिवसेना आणि आरबीआयनं विरोध केला आणि वर्सोवा-घाटकोपर या मुंबईतील पहिल्या मेट्रोचं नाव मुंबई मेट्रो असणार असल्याचं जाहीर केलं.


सन 2014 साली राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार बदललं आणि मुंबईतील अनेक मेट्रोची प्रकल्प जाहीर झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोचे जाळे कल्याण आणि विरारपर्यंत विणणार असल्याचं सांगितलं. अशात मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो प्रकल्पाचा जन्म झाला. मात्र, कारशेडचा वाद सुरु झाला तो आजतागायत सुरुच आहे. 


एमएमआरसीएलनं मेट्रो-3 च्या निविदा काढल्या. प्रकल्प खर्च 23 हजार कोटींचा होता. मात्र या प्रकल्पाचा खर्च 10 हजार कोटींनी वाढला आणि संपूर्ण प्रकल्पाचा खर्च 33 हजार कोटींच्या पार गेला. 2019 साली आरेत कारशेडसंदर्भात झालेल्या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आणि यात शिवसेना उतरताना बघायला मिळाली. सत्तेत असतानाही शिवसेना-भाजप संघर्ष सुरु असताना रस्त्यावर उघड संघर्ष बघायला मिळाला. 


मेट्रो-3 च्या अधिकारी अश्विनी भिडे यांनी कारशेडसाठी आरेचीच जागा योग्य आहे म्हणत काम सुरु केलं खरं, पण त्याला मोठा विरोध होताना दिसला. अशात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनीही आरेतील कारशेडला विरोध केला. अनेक जणांवर गुन्हे दाखल झालेमात्र प्रकल्पाचं काम सुरुच राहिलं.


सन 2019 सालच्या शेवटी महाविकासआघाडी सरकार आलं आणि मेट्रो-3 चा कारशेड कांजूरमार्गला हलवलं गेलं. आरे आंदोलनातील लोकांवर गुन्हे देखील मागे घेण्यात आले. मात्र, पुन्हा एकदा राज्य सरकार बदललं आणि कांजूरमधील कारशेड प्रकल्प पुन्हा एकदा आरेत दाखल झाला. मात्र, निधीची कमतरता, प्रकल्प पूर्ण करण्याची गती आणि कोरेनाच्या पार्श्वभूमीमुळे मेट्रो-3 ला मोठाफटका बसला. आरे आरशेडचं काम अद्यापही पूर्ण झालं नसून याचा वाद अद्यापही न्यायालयात सुरु आहे. 


मेट्रो-३ प्रकल्पाचा पहिला टप्पा येत्या डिसेंबर महिन्यात सुरु करण्याचा मानस असला तरी आरेत कारशेड होण्यासाठी पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. मेट्रो-3 प्रकल्पाचं काम 78 टक्के पूर्ण झालंय. जून 2024 मध्ये लोकांसाठी पूर्णपणे खुला होईल. मात्र, कारशेडच्या राजकारणात मेट्रो अडकल्याने प्रकल्प पुढे धावताना अडचणी येतायत.


मेट्रो 7 आणि मेट्रो 2अ चं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. मात्र, या दोन्ही प्रकल्पाच्या श्रेयवादावरुन लढाई सुरु झालेली आहे. पहिल्या फेजचं उद्घाटन गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं होतं. अशात सरकार बदलताच शिंदे-फडणवीस सरकारनं या प्रकल्पाच्या दुसऱ्या फेजचे उद्घाटन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्याचं ठरवलं. आम्हीच सुरु केलेले प्रकल्पं पुढे नेले जात असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय. 


मेट्रो-7 आणि मेट्रो 2अ मुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, सोबतच वेळेची बचत होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, येत्या काळात आणखी काही प्रकल्प पुढील 2 वर्षात पूर्णत्वास जातायत. अशात याचं देखील राजकारण रंगताना बघायला मिळू शकतं. 


ही बातमी वाचा: