Nawab Malik Son Faraz Malik: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांचे पुत्र फराज मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. फराज मलिक (Faraz Malik) आणि त्यांच्या फ्रेंच मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. खोट्या व्हिसाप्रकरणी फराज मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी यांसदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे.
सध्या सीबीआय आणि ईडीच्या फेऱ्यात अडकलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचे पुत्र फराज मलिक यांच्याविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फराज मलिक यांनी व्हिसा अर्जासोबत बनावट कागदपत्रं जोडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी नवाब मलिक यांच्या मुलाविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आयपीसीच्या कलम 420, 465, 468, 471, 34 आणि फॉरेनर्स अॅक्ट, 1946 च्या कलम 14 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
प्रकरण नेमकं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 2 मार्च 2022 पासून 23 जून 2022 दरम्यान, कुर्ल्यामध्ये बनावट कागदपत्र तयार करण्यात आली होती. 2020 मध्ये या कागदपत्रांमध्ये फेरफार करण्यात आली. एका अधिकाऱ्याच्या तक्रारीवरुन कुर्ला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितलं की, फराज आणि हॅमलिन (फ्रेंच महिला) याच्याव्यतिरिक्त पोलिसांनी आणखी काही लोकांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक, हॅमलिन 2020 मध्ये भारतात आली होती. तिनं व्हिसा मुदत वाढवण्यासंदर्भात अर्ज केला होता. पण, त्या अर्जासोबत बनावट कागदपत्र जोडली होती. दरम्यान, ईडीने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये नवाब मलिकांना अटक केली होती. ते अजूनही अटकेत असून सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
नवाब मलिक यांच्यावर आरोप काय?
हसीना पारकर, सलीम पटेल, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या महिलेने 1999 मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. याद्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे.
मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे. तर, नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. गोवावाला कंपाउंडमधील जमीन ही कायदेशीर मार्गाने खरेदी केली असल्याचा दावा त्यांनी केला. सुमारे पाच महिने उलटूनही तपास यंत्रणेकडून सबळ पुरावे दाखल करण्यात आले नसल्याचा दावा मलिकांकडून करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप याप्रकरणात दिलासा मिळाला नाही. त्यामुळं आज न्यायालयात काय निर्णय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.