मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईतील विविध विकास कामांचे उद्घाटन तर होणारच आहे, मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंगण फुंकले जाणार आहे असे देखील चर्चा आहे.
गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार आहे. उद्या होणाऱ्या अनेक विकासकामांचा फायदा मुंबईकरांना आगामी काळात होणार आहे. त्यामुळे नक्कीच या विकासकामांच्या माध्यमातून आगामी मुंबई महापालिका दृष्टीने, भाजप आणि शिंदे गटाकडून मुंबईकरांची मन जिंकण्याचा प्रयत्न होताना पहायला मिळतोय.
कोणत्याही परिस्थितीत यंदा मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा रोवायचाच, महापालिकेची सत्ता हाती घ्यायचीच असां चंग बांधून भाजप-शिंदे कामाला लागल्याचं दिसून येतंय. भाजप आणि शिंदेच्या 'मिशन मुंबई'ला सुरुवात झाली असून, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन करून मुंबईकरांच्या हृदयात कामांनी जागा निर्माण करण्याची शिंदे-फडणवीस यांची खेळी आहे अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये सर्वप्रथम 2017 च्या निवडणुकीत जिंकलेल्या भाजपच्या 82 जागा आणि शिंदे गटात आलेल्या लोकांच्या कशा राखल्या जातील याबाबत प्रयत्न केले जात आहेत. तर 2017 मध्ये दुसऱ्या क्रमांकावरची मते मिळालेल्या 30 जागा निवडून आणण्याकरता प्रयत्न करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या वॉर्डातील असंतुष्टांना हेरुन तिथे मतविभागणी करणं, तसेच महत्त्वाचं म्हणजे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र या सणांच्या माध्यमातून मतांची जोडणी करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. मराठी दांडिया जागर मुंबईचा अशा विविध अभियानामार्फत भाजपचे मुंबई महापालिकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात आरोग्य सेवा असो किंवा मग मुंबईतील रस्ते तसेच सांडपाण्याचा प्रश्न किंवा मग वाहतूक कोंडी वरचा पर्याय असो, या सगळ्यातून मुंबईचा विकास साधण्याचा प्रयत्न या सर्व लोकार्पण आणि भूमिपूजन केल्या जाणाऱ्या प्रकल्पातून होणार आहे. मात्र मोदींचा दौरा हा आगमी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजप शिंदेंचा विविध प्लॅन आहे.
ही बातमी वाचा: