Mumbai Metro-3 Trial Run: मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्यादृष्टीने आज मोठा टप्पा पार पडणार आहे. मुंबई मेट्रो-3 ची (Mumbai Metro-3 Trial Run) चाचणी आजपासून सुरू होणार आहे. सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरु करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरील मेट्रो-3 चे मे 2021 अखेर पर्यंत भुयारीकरणाचे काम 96 टक्के पूर्ण झाले आहे. तर एकूण प्रकल्पाचे काम 67 टक्के झाले आहे. मात्र, कारशेडबाबत  निर्णय झालेला नसल्याने मेट्रो-3 चे भवितव्य अंधारातच आहे. कारशेड निर्णयाच्या विलंबामुळे मेट्रो - 3 ची मुदत साधारण दोन-तीन वर्षे पुढे जाण्याची भीती आहे.


मुंबई मेट्रो-3 च्या रेल्वे रेकची चाचणी करण्यात येत आहे. मात्र, नेमकी ही चाचणी कशी असणार, हे जाणून घेऊयात:


> रोलिंग स्टॉक आणि ट्रॅक या दोन्हीच्या डिझाईनची योग्यता सिद्ध करून आवश्यकतेप्रमाणे पुढील नवीन तांत्रिक सुधारणा अमलात आणण्यात याव्यात यासाठी मेट्रो लाईन तीनची चाचणी करणे आवश्यक आहे


> आठ डब्यांच्या गाडीसाठी 85 किमी ते 95 किमी प्रति तास ही गती असणार आहे. 


> 'ट्वीन बुटेड लो व्हायब्रेशन ट्रॅक  हाय अटेंनयूएशन' असे नव्या प्रकारचे क्रॅक्स स्ट्रक्चर कोणत्याही भूमिगत मेट्रोसाठी भारतात प्रथमच स्वीकारले आहे


> मेट्रोच्या चाचणीच्या सुरुवातीला आरेतील सारिपूतनगर ते मरोळ नाका सुमारे तीन किलोमीटर दरम्यान ट्रेन चाचणी सुरू केली जाणार आहे.


>> या चाचणीत काय पाहिले जाणार ?


> ट्रेन प्रवासी वाहतुकीसाठी सक्षम आहे का याचा विचार होणार. त्याशिवाय, मध्यम आणि हाय वोल्टेजवर ट्रेनची चाचणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय, ब्रेकची क्षमता,  एअर कम्प्रेसर, स्वयंचलित दरवाज्यांची कार्यक्षमता, वायुविजन याचीही चाचणी होणार आहे. मेट्रो-3 ची चाचणी ही भूमिगत चाचणी होणार आहे. मेट्रो-3 चा मार्ग भूमिगत असणार आहे. 


>> मेट्रो-3 मुळे काय फायदा होणार?


> मुंबई मेट्रो लाईन 3 च्या  ट्रेन्स आठ डब्यांच्या आहेत. सुरुवातीपासूनच वाढत्या प्रवाशांची गरज पूर्ण करतील


> 75% मोटाराजेशनमुळे गाड्यांच्या धावण्याची कार्यक्षमता उत्तम राहील


> रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे 30% विद्युत ऊर्जेची बचत होईल. त्याशिवाय, चाकांची तसेच ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज देखील कमी होईल.


> मेट्रो ट्रेनच्या डब्यांची रुंदी 3200मीमी असून उभे आणि बसलेल्या स्थितीत अंदाजे 2400 प्रवासी एका गाडीतून प्रवास करू शकतील.


> मेट्रो डब्यांमध्ये वातानुकूलन यंत्रणेअंतर्गत कार्बन डाय ऑक्साईड आणि आद्रतेसाठी स्वयंचलित नियंत्रण प्रणाली आहे. त्यामुळे सर्व हवामान परिस्थितीमध्ये प्रवाशांना उत्तम आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल